अनिल भैय्या अमर रहे... कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला... 

सुर्यकांत वरखड 
Wednesday, 5 August 2020

शिवसेनेचे उपनेते तथा माजी मंत्री अनिल रामकिसन राठोड (वय 70) यांचे आज (ता. 5) पहाटे हृदयविकराच्या तीव्र झटक्‍याने निधन झाले. ते कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर त्यांना नगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

नगर : शिवसेनेचे उपनेते तथा माजी मंत्री अनिल रामकिसन राठोड (वय 70) यांचे आज (ता. 5) पहाटे हृदयविकराच्या तीव्र झटक्‍याने निधन झाले. ते कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर त्यांना नगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 

खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना आज पहाटे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी काळताच सकाळपासून त्या खासगी रुग्णालयात शिवसैनिकांनी गर्दी केली होती. पोलिसांनी सुरवातील गर्दी पांगविण्याचा प्रयत्न केला. अंतयात्रा खासगी रुग्णालयातून थेट अमरधाममध्ये जाईल, अशी सूचना प्रशासनाने मांडली. मात्र,

शिवसैनिक आक्रमक झाल्याने रुग्णवाहिकेतून अंतयात्रा काढण्यास मूभा देण्यात आली. यशवंत कॉलनी येथील खासगी रुग्णालयापासून तारकपूर, पत्रकार चौक, सर्जेपुरा, तेलखुंट, चितळे रोड, चौपाटी कारंजा, दिल्लीगेट, अंतिम चौक नालेगाव मार्गे अंत्ययात्रा अमरधाममध्ये पोचली. चितळे रस्त्यासह जागोजागी शिवसैनिकांनी रुग्णवाहिकेवर पुष्पवृष्टी केली. दुपारी 12 : 30 वाजता अमरधाम येथील मोक्षधाम विद्युतदाहिनीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिस दलातर्फे हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून अखेरची सलामी देण्यात आली.

अमरधाम परिसरात शिवसेनेचे कार्यकर्ते व राठोड प्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. अनेकांच्या डोळ्यात आश्रू तरळले. अत्यंत भावनिक, साश्रूनयनांनी राठोड यांना अखेरचा निरोप दिला. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा विक्रम, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. 
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे, शिवशाहीर विजय तनपुरे आदी उपस्थित होते. 

अनिल भैय्या अमर रहे! 
तारकपूर परिसरातील खासगी रुग्णालयापासून ते अमरधामपर्यंत शिवसैनिकांनी दुचाकी रॅली काढली. "अनिल भैय्या अमर रहे... कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला...' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Funeral on Shivsena Deputy Leader Anil Rathore in ahmednagar