नेवाशात गडाख-मुरकुटे गट ग्रामपंचायतीसाठी पुन्हा भिडणार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 December 2020

अनेक गावात गडाख यांच्याच दोन्ही गटात तर कुकाणे, भेंडे बुद्रुक येथे माजी आमदार चंद्रशेखर पाटील यांच्याच दोन गटात मैत्रीपूर्ण लढती होण्याचे चिन्हे आहेत.

नेवासे : लॉक डाऊननंतर प्रथमच निवडणुका होत आहेत. नेवासे तालुक्यातील 59 ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या जानेवारी महिन्यात होत आहेत. त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. गावागावात राजकीय फड रंगात आहेत.

निवडणुकीच्या या रणधुमाळीने ग्रामीण भागातील राजकारण चांगलेच ढवळून निघत आहे. तालुक्यातील 144 ग्रामपंचायत पैकी नव्वद टक्के ग्रामपंचायतीवर राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचेच वर्चस्व असून होणाऱ्या निवडणुकीतही हीच परिस्थिती कायम राहील यासाठी गडाख गट सक्रिय राहील. मात्र तालुक्याच्या राजकारणात आपले अस्तित्व दाखविण्यासाठी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा गट देखील निवडणुकीच्या मैदानात सक्रिय राहील. त्यामुळे या निवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता धुसरच आहे.

दरम्यान तालुक्यात राष्ट्रवादीची परिस्थिती निश्चितच मुरकूटें च्या एकला चलोरे मुळे निष्ठावान व नव्यांचेच दोन गट पडलेल्या भाजपापेक्षा चांगली आहे. सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असल्याने तालुक्यात शिवसेनेचा गडाख गट, राष्ट्रवादीचे माजी आमदार पांडुरंग अभंग, काशिनाथ नवले हे महाआघाडीतील घटक पक्षांनाही बरोबर घेऊन समन्वयाने सक्रिय आहे.

भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हे सक्रिय असलेतरी ते या निवडणुकीत एकाकी पडलेले दिसतात. या निवडणुकीत राजकीय पक्षाचे नेते, कार्येकर्ते सक्रिय असलेतरी गावपातळीवर ते पक्षविरहित एकमेकांना सहकार्य करतील असे दिसते. त्यामुळे तालुक्यात गडाख-मुरकुटे अशीच लढत होईल असे दिसते. 

अनेक गावात गडाख यांच्याच दोन्ही गटात तर कुकाणे, भेंडे बुद्रुक येथे माजी आमदार चंद्रशेखर पाटील यांच्याच दोन गटात मैत्रीपूर्ण लढती होण्याचे चिन्हे आहेत. दरम्यान गडाख हे मुरकुटे यांना देवगाव तर मुरकुटे हे गडाखांना सोनई ग्रामपंचायत निवडणुकीत एकमेकांसमोर कसे आव्हान उभे करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

या ठरणार लक्षवेधी निवडणूका

तालुक्यातील होणाऱ्या 59 ग्रामपंचायत पैकी राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या सोनई, कुकाणे, देवगाव,भेंडा बुद्रुक, गेवराई, पिंप्रीशहाली प्रवरासंगम, चांदा, सलाबतपूर, खरवंडी, बेलपिंपळगाव, शनिशिंगणापूर, जेऊरहैबती, तेलकुडगाव या ग्रामपंचायतीच्या निवडणूक लक्षवेधक होणार आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Gadakh-Murkute group will fight against each other in the Gram Panchayat elections in Newash