नेवासे तालुक्यात गणेशोत्सवाला यंदा येणार घरगुती स्वरुप; असा असणार उत्सव

सुनील गर्जे
Monday, 17 August 2020

नेवासे तालुक्यात गणेशोत्सवाला यंदा कोरोनामुळे घरगुती स्वरूप येणार आहे. छोट्या मूर्ती, नित्यपूजेला चार- पाचच कार्यकर्ते अशा साध्या पद्धतीने यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय मंडळांनी घेतला आहे.

नेवासे (अहमदनगर) : नेवासे तालुक्यात गणेशोत्सवाला यंदा कोरोनामुळे घरगुती स्वरूप येणार आहे. छोट्या मूर्ती, नित्यपूजेला चार- पाचच कार्यकर्ते अशा साध्या पद्धतीने यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय मंडळांनी घेतला आहे.

नेवासे तालुक्यात नेवासे फाटा, घोडेगाव,  भेंडे, प्रवरसंगम येथील गणेशोत्सव तालुक्यात ओळखला जातो.  उत्सव काळात देखावे पाहण्यासाठी तसेच विद्युत रोषणाई, सांस्कृतिक, कीर्तने हजारो गणेशभक्त येत असतात. त्यामुळे रस्ते गर्दीने फुलून जातात. ही परंपरा यंदा कोरोनाच्या महामारीमुळे खंडित होणार आहे.

यंदाची परिस्थिती त्याहून वेगळी आहे. कोरोनाच्या सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घातली आहे. त्यामुळे मंडळांच्या सर्व कार्येकर्त्यांना एकत्र येणेही यंदा शक्य होणार नाही. साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे निर्णय घेतला आहे. मूर्तीची उंची घरगुती गणेशा इतकीच राहणार असल्याने उत्सवाचे स्वरूपही घरगुतीच राहणार आहे.

250 ठिकाणी होते 'श्री'ची प्रतिष्ठपणा 
गेल्यावर्षी तालुक्यात १७४ मोठे तर ९७ लहान अशा २७१ सार्वजनिक गणेश मंडळांनी 'श्री'ची प्रतिष्ठापना केली होती. यात २४ गावात 'एक गाव एक गणपती' हा उपक्रम राबविण्यात आला होता.

नेवासे फाटा येथील राजमुद्रा ग्रुपचे अध्यक्ष सतीश निपुंगे म्हणाले, कोरोना महामारीमुळे यावर्षी आम्ही अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करणार आहोत,  यंदाची मूर्ती  दोन-अडीच फुटाची मूर्ती बसवून मोजक्याच कार्यकर्त्याच्या उपस्थितीत नित्यपूज़ा होईल. आम्ही सर्व नियमांचे पालन करणार आहोत.

घोडेगावमधील गणेशोत्सव मंडळाचे (शनिचौक) अध्यक्ष दिलीप काळे म्हणाले, यावर्षी छोटी मूर्ती बसवून कोणत्याही झगमगाटाशिवाय साधेपणाने उत्सव साजरा करणार आहोत. कोरोना संकटांच्या साखळीतून सुटका करण्याची प्रार्थना करु.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav in Nevasa taluka this year due to corona simply