नगरमध्ये चार ठिकाणी होणार कचरा डेपो

amc
amc

नगर : सावेडी कचरा डेपो हटवून तो बुरुडगावला नेण्यास नगरसेवक गणेश भोसले यांनी महापालिकेच्या ऑनलाइन महासभेत आज जोरदार विरोध केला. त्यामुळे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सावेडीतील कचरा डेपो न हलविता शहरात चार ठिकाणी कचरा डेपो करावेत, असा ठराव मंजूर केला. यासाठी दोन ठिकाणी महापालिकेने जागा संपादित करून डेपो तयार करण्याची प्रक्रिया करावी, असे सांगितले. त्यामुळे आता सावेडीतील कचरा डेपो हटणार नाहीच; उलट शहरात आणखी दोन ठिकाणी छोटे खतनिर्मिती प्रकल्प उभे राहणार आहेत.

अवश्य वाचा - मुलीच हुश्शार
 
महापालिकेची महासभा आज ऑनलाइन झाली. महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, सभागृहनेते स्वप्नील शिंदे, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार, उपायुक्‍त डॉ. प्रदीप पठारे, नगररचनाकार राम चारठाणकर आदींसह नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते. 


बारस्कर यांनी, सावेडीतील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची नागरिकांची मागणी असल्याचे सांगितले. सावेडी उपनगरातील स्मशानभूमीची मागणीही त्यांनी लावून धरली. गणेश भोसले म्हणाले, ""न्यायालयाने बुरुडगावमध्ये 100 आणि सावेडीत 50 टन क्षमतेचे खतनिर्मिती प्रकल्प उभारण्याचे आदेश दिले आहेत. सावेडीतील प्रकल्प बुरुडगावला हलविल्याने राष्ट्रीय हरित लवादाने दंड केल्यास तो दंड महापालिका अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करावा. दंड झाल्यास त्याला आयुक्‍त जबाबदार राहतील. त्यामुळे महापालिकेने शहरात आणखी दोन ठिकाणी छोटे खतनिर्मिती प्रकल्प उभे राहिल्यास सावेडी व बुरुडगाव कचरा डेपोवरील ताण कमी होईल.'' 

दोन रुग्णवाहिकांची होणार खरेदी 
महापालिकेने नवीन रुग्णवाहिका खरेदी करावी, अशी मागणी माजी महापौर सुरेखा कदम, दीपाली बारस्कर, डॉ. सागर बोरुडे आदींनी केली. स्वॅबतपासणीचे अहवाल लवकर मिळण्यासाठी यंत्रणा उभारण्याची सूचनाही केली. मनोज कोतकर यांनी शहरात शासकीय अँटिजेन किट वाटपाबाबत प्रश्‍न विचारला; पण वैद्यकीय आरोग्य अधिकारीच सभेत नसल्याने उत्तरे मिळाली नाहीत. 

एक विषय चुकून विषयपत्रिकेवर 
दलित वस्ती सुधार हा विषय चुकून विषयपत्रिकेत आल्याने, या विषयावर चर्चा करू नये, असे महापौरांनी सांगितले. त्यामुळे गणेश भोसले यांनी "चुकून कसा? ही बाब महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात कशी आली नाही?' असा जाब विचारला. 

बीएच-4 वाहनखरेदी 
शासनाने बीएच-4 वाहनांवर बंदी घातलेली असताना महापालिकेने नुकतेच घनकचरा वाहतुकीसाठी बीएच-4 वाहन खरेदी केले. याबाबत विनित पाऊलबुधे यांनी प्रश्‍न विचारले. हा विषय सभेत नसल्याने पुढील महासभेत घेऊ, असे महापौर वाकळे यांनी सांगितले. 

नगरसेवकांचाच निधी घेऊन पथदिवे 
महापालिकेतील प्रत्येक नगरसेवकाला प्रभागातील छोट्या नागरी समस्या सोडविण्यासाठी महापालिकेकडून पाच लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे. यातील प्रत्येक नगरसेवकाच्या निधीतील एक लाख रुपये काढून घेऊन त्यातून त्यांच्याच प्रभागांमध्ये नव्याने पथदिवे बसविण्यात येणार आहेत. शहरातील सर्व पथदिवे नव्याने बसविणार आहोत, असे महापौर वाकळे यांनी सांगितले. 

श्‍वान निर्बीजीकरण केंद्र सुरू होणार 
महापालिकेचे पिंपळगाव माळवी येथील श्‍वान निर्बीजीकरण केंद्र सुरू करण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या आहेत. लवकरच शहरातील मोकाट कुत्र्यांवरील कारवाई सुरू होईल, असे आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांनी सांगितले. 

अनधिकृत बांधकामे पाडणार 
नगर शहरात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. ती जमीनदोस्त करावीत, तसेच ओढ्या-नाल्यांवरील बांधकामेही काढून त्यांचा नैसर्गिक प्रवाह खुला करावा, अशी मागणी बारस्कर यांनी केली. त्यावर महापौर वाकळे यांनी, सर्व अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करून ओढ्या-नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह खुले करण्याचे आदेश आज दिले. 

नटराज हॉटेलमध्ये कोविड सेंटर 
शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे दसरेनगर व शासकीय तंत्रनिकेतनबरोबरच आता नटराज हॉटेलमध्येही कोविड सेंटर उघडण्याची तयारी महापालिकेने केली आहे. येथे 300 बेडचे कोविड सेंटर उघडण्यात येणार असल्याचे महापौर वाकळे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com