
कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेवून २० मार्च २०२० रोजी घोडेगाव येथील उपबाजारात भरणारा जनावरांचा बाजार बंद करण्यात आला होता.
सोनई: राज्यात प्रसिद्ध असलेला घोडेगाव (ता.नेवासे) येथील जनावरांचा बाजार सहा महिन्याच्या विश्रांतीनंतर शुक्रवार (ता.२३) पासुन सुरु होणार आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती कडूबाळ कर्डिले व सचिव देवदत्त पालवे यांनी दिली.
कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेवून २० मार्च २०२० रोजी घोडेगाव येथील उपबाजारात भरणारा जनावरांचा बाजार बंद करण्यात आला होता. येथे
राज्यासह परराज्यातून व्यापारी व शेतकरी शेळी, मेंढी, गाय, बैल व म्हशी घेण्यासाठी येत होते. बाजारात दर शुक्रवारी कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असल्याने गाव व परीसरातील लहान-मोठ्या व्यावसायिकांना फटका बसला होता. शेतक-यांनाही या बंदमुळे मोठे नुकसान सहन करावे लागले.
जनावरांचा बाजार बंद झाल्यानंतर म्हैस व्यापा-यांनी ऑनलाईन म्हैस विक्रीचा नवा फंडा पुढे आणत खरेदी-विक्रीचे व्यवहार केले. शेतकरी, ग्राहक व व्यापारी असा व्हाॅटसअप ग्रुप करुन त्यावर म्हशीचे फोटो, व्हिडिओ व किंमत टाकली जात होती. पसंती झाल्यानंतर व्यापारी पुढील ग्राहकास मोबाईलवर
व्हिडिओ काॅल करुन म्हशीला चालवून दाखवत होते. येथील पसंती झाल्यानंतर फोन-पे अथवा गुगल-पेनुसार खरेदी होत होती.
तीन दिवसाने जनावरांचा बाजार सुरु होणार असला तरी बाजार समितीच्या वतीने कोरोना संसर्गाची पुर्ण काळजी घेतली जाणार आहे.बाजाराच्या प्रवेशद्वारात सॅनेटायझर ठेवले जाणार आहे.मास्क असणा-यांनाच प्रवेश दिला जाणार आहे.एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घेणार आहे. असे सचिव पालवे यांनी सांगितले.
संपादन - अशोक निंबाळकर