भाजपने नागरिकांच्या आशा- अपेक्षांवर पाणी फिरवले

सचिन सातपुते
Thursday, 5 November 2020

शेवगाव नगरपालिकेच्या स्थापनेनंतर विकासामुळे शहराचा चेहरामोहरा बदलेल अशी आशा नागरीकांना होती.

शेवगाव (अहमदनगर) : शेवगाव नगरपालिकेच्या स्थापनेनंतर विकासामुळे शहराचा चेहरामोहरा बदलेल अशी आशा नागरीकांना होती. परंतू सत्ताधारी भाजपने नागरीकांच्या आशाआपेक्षांवर पाणी फिरवले आहे. त्यामुळे येणारी नगरपालिकेची निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे प्रतिपादन पंचायत समितीचे सभापती डाँ. क्षितीज घुले यांनी केले. 

शेवगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नगरपालिका निवडणुकी संदर्भात शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये सभापती घुले बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती अरुण लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मन्सूर फारोकी, ज्ञानेश्वरचे संचालक काकासाहेब नरवडे, बाजार समितीचे संचालक संजय फडके, युवकचे शहराध्यक्ष ताहेर पटेल, अनिल इंगळे, अरुण जाधव, नंदकुमार मुंढे, नंदकुमार सारडा आदी प्रमुख उपस्थित होते. 

यावेळी घुले म्हणाले की, भाजपाने मोठा आटापिटा करुन नगरपरीषदेत सत्ता मिळवली. मात्र गेल्या अडीच तीन वर्षात शहरातील स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते, या मुलभूत प्रश्नांवर काहीही काम झालेले नाही. त्यामुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. धरण जवळ असूनही व शंभर टक्के भरलेले असतांनाही दहा पंधरा दिवसातून शहराला पाणी पुरवठा होतो. त्याच बरोबर वाहतुक कोंडी, खराब रस्ते यामुळे अनेक नागरीकांचा बळी गेला आहे. 

सत्ताधारी पदाधिकाऱ्यांना नागरीकांचे काहीही घेणेदेणे नाही. असे त्यांच्या कारभारावरुन दिसते. त्यामुळे येत्या निवडणुकीत शहरातील नागरीकांना दिलासा देण्यासाठी माजी आमदार नरेंद्र घुले व माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्ण ताकतीने उतरणार आहे. सत्ता असतांना व नसतांना शहरात निष्ठेने काम करणा-या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम करु.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ghule informed that NCP will contest Shevgaon municipal election