कानावर विश्वास नाही बसायचा ः ही मुलगी डोळे बांधून वाचते पुस्तक, रंगही ओळखते, काय असेल भानगड

सुनील गर्जे
Tuesday, 8 September 2020

भेंडे बुद्रुक येथील सराफ सागर पंडित यांची कन्या तन्वी'ने औरंगाबाद येथील प्रशिक्षक योगेश दहिहंडे यांच्याकडे मिड ब्रेन ऍक्टिव्हशन'चे प्रशिक्षण घेत डोळे बांधून पुस्तक वाचण्याची व चलनी नोटांची किंमत व रंग ओळखण्याची कला आत्मसात केली आहे.

नेवासे (नगर) : डोळ्यांवर पट्टी बांधून कोणतीही वस्तू, अंक, अक्षरे, रंगभेद अचूकरीत्या ओळखणे, एवढेच नव्हे तर कोणत्याही पुस्तकाचे कोणतेही पान फाडाफडा वाचून दाखवणारी नेवासे तालुक्यातील भेंडे येथील नऊ वर्षांय तन्वी'चे सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडिओ थक्क करणारे आहेत. तिने आत्मसात केलेल्या या कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लहान मुलांमध्ये सकारात्मक उर्जेचा मोठा स्त्रोत असतो. त्यांचे हे सामर्थ्य विधायक ज्ञान साधनेकडे वळविले आणि त्याला नियमित सराव, ध्यान धारणा, मिड ब्रेन अक्टिव्हेशनची जोड दिली तर डोळे घट्ट बांधूनही ती मुले कोणतीही वस्तू. अक्षरे, रंग अचूकरीत्या ओळखू शकतात. हा कुठलाही चमत्कार नाही. तर हे एका अल्पकालीन प्रशिक्षणातून साध्य होते.

भेंडे बुद्रुक येथील सराफ सागर पंडित यांची कन्या तन्वी'ने औरंगाबाद येथील प्रशिक्षक योगेश दहिहंडे यांच्याकडे मिड ब्रेन ऍक्टिव्हशन'चे प्रशिक्षण घेत डोळे बांधून पुस्तक वाचण्याची व चलनी नोटांची किंमत व रंग ओळखण्याची कला आत्मसात केली आहे.

तन्वी हिने डोळ्यांवर कापडी पट्ट्या बांधलेल्या स्थितीत पुस्तकातील पान नंबर, त्यातील चित्र, रंग, संख्या, पाच रुपयांपासून दोन हजारांची नोट व त्यांचे रंग अचूक ओळखणे, कागदावर लिहिलेली अक्षरे, वाक्य स्पर्श व कागदावर टिचक्या मारून आवाजावरून ओळखणे, तसेच मोबाईल चॅटिंग करणे, लपुन ठेवलेली वस्तू वासा वरून शोधणे आदी क्रिया अचूकरीत्या करते. तिचे सोशल मीडियावर सध्या अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहे.  

काय आहे मिडब्रेन अॅक्टिव्हेशन?
मिडब्रेन अँक्टिव्हेशन ही संकल्पना आता जगभर विकसित होत आहे. यात व्यक्तीच्या शरीरातील सुप्त बलस्थाने व कल्पनाशक्तीचा अधिक वापर केला जातो. शरीरात असलेली सप्तचक्रे जागृत झाली तर कपाळाच्या मध्यभागी असलेल्या ज्ञानाचा तिसरा डोळा (थर्ड आय) उघडतो आणि कल्पनाशक्तीच्या सहाय्याने माणसाला अदृश्य तेही दिसायला लागले. विशेष म्हणजे डोळ्यांपेक्षाही त्याची सुस्पष्टता अधिक असते. त्यामुळे बंद डोळ्यांनीही वाचता येते, वासावरून वस्तू ओळखता येते. यात कुठलाही चमत्कार नाही. परंतु ही एक ज्ञानाधारित संकल्पना असल्याने त्याला काही मर्यादाही आहेत, असे प्रशिक्षक योगेश दहिहंडे यांनी सांगितले.
 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This girl reads the book blindly and also recognizes color