
अहमदनगर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आणखी एका निर्णयात बदल करुन भाजपला दणका दिला आहे. मराठी भाषा विभागांर्तग असलेल्या मराठी विश्वकोशाच्या अद्यावतीकरणासाठी स्थापन केलेल्या ज्ञानमंडळाच्या खर्चाला आता कात्री लावण्यात आली आहे. ज्ञानमंडळात काम करणाऱ्या समन्वयकांना पूर्वी महिन्याला मानधन दिले जात होते. मात्र, आता ते जेवढे काम करतील तेवढेच मानधन दिले जाणार आहे. याशिवाय प्रवास आणि बैठकीवर होणारा खर्चही कमी केला आहे.
महाराष्ट्र सरकारच्या मराठी विश्वकोशातील सर्व खंडातील अनेक नोंदी कालबाह्य झाल्या आहेत. त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी भाजप सरकारने 2016 मध्ये विषयनिहाय न्याय मंडळाची स्थापना केली होती. याबरोबर ज्ञानमंडळाने करावयाच्या कामाची कार्यपद्धती देखील सरकारने ठरवून दिली होती. त्यानुसार ज्ञानमंडळाने सर्व विषयातील ज्ञान शाखांमध्ये झालेले बदल विचारात घेऊन विश्वकोशातील नोंदीचे अद्यावतीकरण करणे आवश्यक होते.
ज्ञानमंडळाबरोबर केलेल्या करारानुसार मंडळाकडून प्रतिवर्षी १०० ते २०० नोंदी येणे आवश्यक होते. त्यानुसार सर्व ज्ञानमंडळांनी त्यांना नेमून दिलेल्या विषयाच्या विश्वकोशाच्या नोंदीचे संपूर्ण अद्यावतीकरण तीन वर्षात पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतु महाराष्ट्र मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने अंतर्गत मंडळाचा आढावा घेतला. तेव्हा मंडळावरील खर्चाच्या मानाने त्यांच्याकडून मिळणाऱ्या नोंदणीचे प्रमाण कमी आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2020- 21 या आर्थिक वर्षात राज्याची कर व कराशिवाय येणाऱ्या उत्पन्नातील अपेक्षित महसूलातील घट व त्यांचे राज्य व्यवस्थेवर झालेले परिणाम लक्षात घेऊन वित्त विभागाने काही सूचना केल्या आहेत. त्यानुसरून सरकारने आढावा घेऊन खर्चावर नियंत्रण करण्यासाठी काही योजना रद्द केल्या होत्या. त्यातूनच ज्ञानमंडळावरील खर्च नियंत्रणात आणण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे.
सध्या ज्ञानमंडळासाठी जे समन्वयक कार्यरत आहेत. त्यांनी नोंदी केल्या किंवा नाही केल्यातरी त्यांना प्रतिमहिना १५ हजार रुपये म्हणजेच वर्षाला एक लाख 80 हजार रुपये मानधन दिले जात होते. आता ज्ञानमंडळामार्फत करण्यात येणाऱ्या नोंदीची सांगड समन्वयकाच्या मानधनाबरोबर घालण्यात आली आहे. समन्वयकांना यापुढे प्रति नोंदीसाठी ५०० रुपये मानधन देण्यात येणार आहे. म्हणजेच वर्षाला समन्वयक जेवढ्या नोंदणी करतील, त्याच प्रमाणात मानधन दिले जाणार आहे.
समन्वयकाच्या मानधनावरील खर्चही कामाच्या प्रमाणात असणार आहे. नोंदी जास्त झाल्या तर जास्त मानधन व नोंदी कमी झाल्या तर कमी मानधन मिळेल. या मंडळाच्या समन्वयकपदावर काम करत असलेल्या बहुतांश समन्वयक हे विद्यापीठ, शैक्षणिक संस्थामध्ये मोठ्या पदावर काम करणार्या तज्ञ व्यक्ती आहेत.
ज्ञानमंडळाच्या लेखक कार्यशाळा व प्रशिक्षण वर्ग तसेच तज्ञ सल्लागार बैठकाही आता आधुनिक संगणकीय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होणार आहेत. त्यामुळे होणारा खर्च व वेळेत बचत होणार आहे. या बरोबर बैठकीचे इतिवृत्त अभिलेख हे संगणकीय पद्धतीने जतन करून ठेवले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.