पारनेर मतदारसंघातील ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी दोन्ही गटाशी चर्चा करणार

एकनाथ भालेकर
Wednesday, 16 December 2020

पारनेर मतदार संघातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध होण्यासाठी त्या त्या गावातील दोन्ही गटांच्या प्रमुखांशी चर्चा करणार आहे.

राळेगण सिद्धी (अहमदनगर) : पारनेर मतदार संघातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध होण्यासाठी त्या त्या गावातील दोन्ही गटांच्या प्रमुखांशी चर्चा करणार आहे. बिनविरोध निवडणुक गावाच्या विकासासाठी महत्वाची असल्याने ग्रामस्थांबरोबरही आपण संवाद साधणार असल्याचे आमदार निलेश लंके यांनी हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर सांगीतले.

विधानसभेचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन मंगळवारी (ता. १५) संपल्यानंतर लगेचच आमदार लंके यांनी पारनेर मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी सक्रिय होण्याची भुमिका घेतली आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे रखडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगूल वाजले असून सध्याच्या हिवाळ्यातील कडाक्याच्या थंडीतही गावोगावी वातावरण चांगलेच तापू लागले आहे. गावातील प्रमुखांची मोर्चे बांधण्याची तयारीही सुरू आहे.

यावेळी आमदार लंके म्हणाले,  ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या तर गावातील हेवेदावे , मतभेद कमी होतील. गावाचा एकोपा टिकून राहिल. गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांची एकजूट महत्वाची असल्याने निवडणुकीमुळे होणारे गटतटांना तिलांजली मिळेल. विधानसभेचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन आज संपले असून आता महिनाभर ग्रामपंचायतीची रणधुमाळीकडे आपण लक्ष घालणार आहे.

पारनेर मतदार संघातील पारनेर व नगर तालुक्यातील ज्या ज्या गावात निवडणुका होत आहेत तेथील दोन्ही गटांशी मी चर्चा करून तेथील निवडणुका बिनविरोध होण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. तसेच ग्रामस्थांशी संवाद साधून बिनविरोध निवडणुकांसाठी आपण आग्रह धरणार असल्याचेही ते म्हणाले.

कोरोना काळात आमदार निलेश लंके यांच्या पुढाकारातून सुरू केलेल्या कोव्हिड सेंटर मध्ये अनेक रूग्णांना तातडीने उपचार मिळाले. स्थलांतरीत मजूर व परप्रांतीय कामगारांसाठी त्यांनी भोजन व निवासाची सोय केली होती. हे उपक्रम राज्यासाठी मार्गदर्शक ठरले होते.

ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे आमदार निलेश लंके यांनी याआधीच जाहीर केले होते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनीही त्यांच्या या भुमिकेचे स्वागत केले होते. आता ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या असून पुढील महिन्यात १५ जानेवारीला मतदान होणार आहे. पारनेर मतदार संघातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या तर पारनेर पॅटर्नची राज्यात व देशात आदर्श ठरू शकेल, असे आमदार लंके म्हणाले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grampanchayat in Parner constituency will hold discussions with both the groups to make it unopposed