
१०२ वर्षांच्या आजीबाईंपुढे कोरोनाने टेकले गुडघे!
राहुरी : कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. गावोगाव कोरोना मृत्यूचे तांडव सुरू आहे. प्रशासन आणि आरोग्य विभाग हतबल झाला आहे. कोरोनाची लागण झाली तर आपला मृत्यू अटळ आहे, अशीच काही लोकांनी भीती मनात घालून घेतली आहे. त्यासाठी बॉडीबिल्डरचे निधन, पैलवानाचे किंवा एखाद्या धार्मिक व्यक्तीचे मृत्यूचा दाखला दिला जातो. त्यामुळे लोकांमध्ये जास्तच घबराट पसरते. एक तर या आजारात मृत्यूचे प्रमाण नगण्य आहे. वेळीच उपचार घेतले तर कोरोनाला सहज हरवता येते. हे शतक पार केलेल्या आजीनेही दाखवून दिले आहे.
राहुरी तालुक्यात ही सकारात्मक घटना घडली आहे. ब्राह्मणीतील 102 वर्षांच्या आजीबाईंनी कोरोनावर यशस्वीपणे मात करून, कौतुकास पात्र ठरल्या आहेत.
सखुबाई गंगाधर हापसे (वय 102, रा. ब्राम्हणी, ता. राहुरी) असे कोरोनावर मात केलेल्या आजीबाईंचे नाव आहे. त्यांची कोरोना चाचणी 20 दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आली. आजीबाईबरोबर एक मुलगा व सून पॉझिटिव्ह आढळून आले. आजीबाईंनी कृषी विद्यापीठातील शासकीय कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला.
सात दिवसानंतर त्या पुन्हा घरी परतल्या. आज अखेरपर्यंत त्या घरातच विलीगीकरणात आहेत. त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. अशी माहिती त्यांचे नातू एकनाथ भाऊसाहेब हापसे यांनी दिली.
Web Title: Grandmother Successfully Defeated
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..