तरुणांना कॉंग्रेस पक्षात मोठी संधी : डॉ. तांबे 

आनंद गायकवाड
Saturday, 12 December 2020

नगर जिल्ह्यात कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोचविताना, लोककल्याणाच्या कामांना प्राधान्य द्यावे.

संगमनेर (अहमदनगर) : नगर जिल्ह्यात कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोचविताना, लोककल्याणाच्या कामांना प्राधान्य द्यावे, तसेच संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करावी, असे आवाहन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. 

भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या अतिथिगृहावर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आयोजित बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके होते. ते म्हणाले, ""समृद्ध परंपरा, सर्वधर्मसमभाव व लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या या पक्षाला मानणारा देशात मोठा वर्ग आहे. तरुणांना कॉंग्रेस पक्षात मोठी संधी असून, प्रत्येकाने विकासाची व लोककल्याणाची कामे प्राधान्याने केल्याने, पक्षाची संघटनात्मक ताकद वाढणार आहे. सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशपातळीवर मोठे आंदोलन उभे आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसला झळाळी मिळाली असून, हा पक्ष अधिक सक्षमतेने काम करीत आहे.'' 

आमदार लहू कानडे म्हणाले, ""बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांना न्याय दिला. जनतेची कॉंग्रेसकडून मोठी अपेक्षा आहे. कार्यकर्त्यांनी पदाची अपेक्षा न करता अधिकाधिक संघटनात्मक व विकासाची कामे करावीत.'' 
इंद्रजित थोरात, तालुकाध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, नगर शहराध्यक्ष किरण काळे, कार्याध्यक्ष सचिन गुजर, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष स्मितल वाबळे, समन्वयक ज्ञानदेव वाफारे, ज्ञानेश्‍वर मुरकुटे, डॉ. एकनाथ गोंदकर, श्रीकांत मापारी, लता डांगे, सुरेश थोरात, रावसाहेब बोठे, सुरेश झावरे, सुभाष सांगळे आदी उपस्थित होते. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Great opportunity for the youth in the Congress party