esakal | पालकमंत्री मुश्रीफ-अण्णांची भेट झाली पण...
sakal

बोलून बातमी शोधा

Guardian Minister Mushrif-Anna met but

हजारे यांच्याशी झालेल्या चर्चेत मंत्री मुश्रीफ यांनी न्यायालयाने या संदर्भात दिलेला निर्णयाची माहिती दिली. 

पालकमंत्री मुश्रीफ-अण्णांची भेट झाली पण...

sakal_logo
By
एकनाथ भालेकर

राळेगणसिद्धी : राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री हसन मुश्रीप यांनी आज (ता. 24) रोजी राळेगण सिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेत सुमारे अर्धा तास चर्चा केली.

मुदत संपलेल्या किंवा संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने प्रशासक न नेमता शासकीय अधिकारी वा कर्मचा-यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात यावी असा आग्रह यावेळी हजारे यांनी धरला. त्याला मंत्री मुश्रीफ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तरी मागणी मान्य झाली नाही तर आंदोलन करण्याच्या भुमिकेचा हजारे यांनी पुनरोच्चार केला.

कोविड 19च्या महामारीमुळे राज्यातील मुदत संपलेल्या किंवा संपत आलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य शासनाने ता. 14 जुलै रोजी एका परित्रकाद्वारे घेतला होता. त्याला हजारे यांनी कडाडून विरोध करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून त्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता.

ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांचा या संदर्भात अभ्यास कच्चा असल्याची टीका हजारे यांनी केली होती. त्यानंतर मंत्री मुश्रीफ यांनी त्याच दिवशी पत्र पाठवून हजारे यांना लेखी पत्र पाठवून शासनाची भुमिका स्पष्ट केली होती. लवकरच राळेगण सिद्धीला भेट घेण्यासाठी येत असल्याचे कळविले होते. त्यानुसार मंत्री मुश्रीफ यांनी शुक्रवारी हजारे यांची भेट घेत सुमारे अर्धा तास सविस्तर चर्चा केली.

हेही वाचा - शरद पवार यांना भाजपचे १० लाखांचे टपाल

या वेळी आमदार नीलेश लंके, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, अॅड. राहूल झावरे, बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, काँग्रेसचे विनायक देशमुख, अॅड. श्याम असावा, बापू शिर्के, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, पोलिस निरीक्षक राजेंद्र गवळी, उपसरपंच सुरेश पठारे, माजी सरपंच जयसिंग मापारी, दत्ता आवारी आदी उपस्थित होते.

हजारे यांच्याशी झालेल्या चर्चेत मंत्री मुश्रीफ यांनी न्यायालयाने या संदर्भात दिलेला निर्णयाची माहिती दिली. सोमवारी न्यायालय अंतिम निकाल देणार असल्याचे सांगीतले. त्यावर हजारे यांनी सरकारने घेतलेल्या पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने प्रशासक नेमणूक करण्याबाबतच्या भुमिकेत घोडेबाजर होऊ शकतो, अशी नाराजी हजारे यांनी व्यक्त केली.

न्यायालयाच्या निकालाचे हजारे यांनी स्वागत केले. परंतु, शासनाने या बाबतच्या मागण्या मान्य केल्या नाही तर पुनश्च आंदोलनाचा इशाराही दिला.


आमदार लंके यांनी घडवली भेट

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा देताच पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी याप्रश्नी सकारात्मक भूमिका घेत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी व हजारे यांच्याशी संपर्क साधून मध्यस्थीची भुमिका घेतली. त्यामुळे हजारे व मंत्री मुश्रीफ यांची भेट आज घडून आली.

राज्यातील गावे समृद्ध करण्यासाठी अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. याकरीता मी राळेगणसिद्धी येथे हजारे यांची भेट घेतली. ग्रामपंचायती संदर्भातील निर्णयाबाबतही त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. कमी पर्जन्यमान असतानाही राळेगण सिद्धीत पाणलोट क्षेत्र विकास योजना यशस्वी झाली अन् गावाचा विकास झाला. पुन्हा राळेगण सिद्धीला येऊन आपण हजारे यांचे मार्गदर्शन घेणार आहोत.

- हसन मुश्रीफ, ग्रामिविकास मंत्री तथा पालमंत्री नगर.

संपादन - अशोक निंबाळकर