उसतोड कामगारांसाठी २७ टक्के दर वाढवू, पालकमंत्री मुश्रीफ यांचे आश्वासन

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 October 2020

तालुक्‍यातील मालेवाडी येथे पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करताना मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

पाथर्डी: ""अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांचे तोंड गोड कसे करता येईल, याची काळजी घेऊ. या भागातल्या ऊसतोडणी कामगारांना तोडणीचा दर 27 टक्‍क्‍यांनी वाढवून देण्याचा आग्रह ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे धरला आहे व तो मान्य केला जाईल,'' अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. 

तालुक्‍यातील मालेवाडी येथे पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करताना मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष ऍड. प्रताप ढाकणे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, महसूल विभागाचे नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, शिवशकंर राजळे, बाळासाहेब ताठे आदी उपस्थित होते. 

आगसखांड, शेकटे, भालगाव येथील पिकांचीही मुश्रीफ यांनी पाहणी केली. मुंगूसवाडे येथे विहिरीत बुडून मृत्युमुखी पडलेल्या माय-लेकीच्या घरी भेट देऊन नारायण हिंगे यांचे सांत्वन केले. सरकारी मदतीसाठी प्रयत्न करतो, असे आश्‍वासन दिले. कोरडगाव येथे स्वप्नील देशमुख, अनिल बंड यांच्यासह शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई तातडीने मिळण्याची मागणी केली. 

शेतकऱ्यांचे तोंड गोड करणार 
पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, ""राज्यातील महाआघाडीचे सरकार शेतकरीहिताचे व ऊसतोडणी कामगारांच्या कष्टाची कदर करणारे आहे. शेतकऱ्यांनी धीर धरावा. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांचे तोंड गोड कसे करता येईल, यासाठीचा निर्णय सरकार करणार आहे. तुम्ही काळजी करू नका.'' 

संपादन - अशोक निंबाळकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guardian Minister Mushrif promises to increase rates for sugarcane workers by persent