पोलिस कारवाईनंतर गुटख्याची तल्लफ महागली

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

पानटपरीसमोर जाऊन गुटखा मागितला, की टपरीचालक अचानक पुडी काढुन हातात देतो. गुटखा विक्रीतून तालुक्‍यात लाखो रुपयांची उलाढाल होते. 

श्रीरामपूर ः पोलिस प्रशासनाने छापे घालून तालुक्‍यात लाखो रुपयांचा गुटखा आणि सुगंधी तंबाखू जप्त केली. गुटख्याची साठेबाजी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली. फरार आरोपींचा शोध सुरू आहे; दुसरीकडे आजही शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी गुटख्याची दुप्पट दराने छुपी विक्री सुरू आहे. त्यामुळे गुटखाविक्रीवर पोलिस कारवाईचा वेगळाच परिणाम झाल्याचे दिसते. 

गेल्या काही दिवसांपासून तालुक्‍यात गुटख्याची दुप्पट दराने छुप्या मार्गाने विक्री सुरू आहे. तत्कालिन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी 10 वर्षांपूर्वी राज्यात गुटखाबंदीचा निर्णय घेतला.

शासनस्तरावर तसा आदेशही निघाला; परंतु निर्णयाची अंमलबजावणी करण्यात अन्न आणि औषध प्रशासनासह पोलिस प्रशासनही अपयशी ठरले. गुटखाविक्री आणि साठेबाजीवर नियंत्रण ठेवणे अन्न-औषध व स्थानिक पोलिस प्रशासनाचीही जबाबदारी आहे. मात्र, मागील 10 वर्षांपासून गुटखाबंदीचा नियम केवळ कागदावर असल्याचे दिसते. 

शहरात अनेक दुकाने अशी आहेत, जेथे पाण्याची बाटली मिळणार नाही; परंतु गुटखा सहज उपलब्ध होईल. शहरात चौकाचौकात, गल्लोगल्ली पानटपऱ्या सुरू आहेत. तेथे दुप्पट दराने छुप्या मार्गाने गुटखा आणि सुगंधी तंबाखूची विक्री होते.

पानटपरीसमोर जाऊन गुटखा मागितला, की टपरीचालक अचानक पुडी काढुन हातात देतो. गुटखा विक्रीतून तालुक्‍यात लाखो रुपयांची उलाढाल होते. 

पोलिस कारवाईमुळे एकलहरे, बेलापूर, निमगाव निघोज, निमगाव जाळी हे गुटखा साठेबाजीचे प्रमुख केंद्र असल्याचे समोर आले. गुटख्याची मागणी केल्यास, आता वाढीव दराने पाकिटे दिली जातात. शहरात होलसेलमध्ये गुटखा मिळण्याची अनेक ठिकाणे आहेत.

तेथे सर्रास गुटख्याची विक्री सुरू असते. पोलिसांकडून गुटखा आणि सुगंधी तंबाखू साठेबाजीच्या ठिकाणी कारवाई होते; परंतु शहरातील गुटखाविक्रीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. शहरात तंबाखू सुपारीमिश्रित गुटखा विक्री करताना कोणीही अडवत नाही. त्यामुळे शेकडो तरुण गुटख्यासह तंबाखूच्या आहारी गेले आहेत.

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास मनाई असताना, गुटखा खाऊन पिचकारी मारणारे अनेक जण दिसतात. सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर, व्यापारी संकुलांच्या इमारती पिचकाऱ्यांनी रंगल्या आहेत. अनेक तरुण गुटखा एकमेकांमध्ये शेअर करतात. सहज मिळत असल्याने गुटखा खाणारे वाढले. गुटखा खाल्याने आरोग्यावर विघातक परिणाम होतात. अनेकांना कर्करोग होऊन बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gutkha craving became more expensive after the police action