श्रीरामपुरात पाणीबाणी, पालिकेवर हंडा मोर्चा

गौरव साळुंके
Monday, 5 October 2020

पाण्याची प्रभागानिहाय तपासणी करुन पाण्याचा दर्जा सुधारावा. अन्यथा तीव्र आंदोलन करुन पालिकेच्या अधिकाऱ्यांना काळे फासणार असल्याचा इशारा अनिल कांबळे यांनी दिला.

श्रीरामपूर : पाणी उशाला कोरड घशाला, श्रीरामपूरकरांना नियमित स्वच्छ पाणी मिळालेच पाहिजे, पाणी आमच्या हक्काचे अशा घोषणा देत येथील नगरपालिकेसमोर कॉंग्रेस समितीच्यावतीने आज हंडा मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. 

उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी उपनगराध्यक्ष अनिल कांबळे, नगरसेवक संजय छल्लारे, संजय फंड यांनी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला धारेवर धरले. शहरात नियमित स्वच्छ पाणी पुरवठा होत नसुन अनेक भागात दुषीत पाणी येते.

पालिकेकडुन अनेकदा रात्र-अपरात्री सोशल मिडीयाद्वारे संदेश पाठवुन अचानकपणे उद्या पाणी येणार नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे नागरीकांची गैरसोय होते. शहरात नियमित स्वच्छ पाणी पुरवठा करावा, पाणी पुरवाठाबाबात काही निरोप असल्यास नगरसेवकांना तातडीने पाठवावा. त्यामुळे नागरीकांची गैरसोय होणार नाही.

पाण्याची प्रभागानिहाय तपासणी करुन पाण्याचा दर्जा सुधारावा. अन्यथा तीव्र आंदोलन करुन पालिकेच्या अधिकाऱ्यांना काळे फासणार असल्याचा इशारा अनिल कांबळे यांनी दिला. उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्यासह नगरेसवक फंड छल्लारे यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत विविध मागण्याचे निवेदन दिले. दिलीप नागरे, सुभाष तोरणे, दीपक कदम, रितेश एडके उपस्थित होते. 

शहरातील पाणी पुरवठा यंत्रणा विस्कळीत झाली असुन त्याला पालिका जबाबदार असल्याचा आरोप कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. शहरातील पाणी पुरवठा तात्काळ सुरळीत करावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा माजी उपनगराध्यक्ष कांबळे यांनी दिला आहे. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Handa Morcha at Shrirampur Municipality