esakal | नेवाशाची कोरोना पीडा लवकरच जाणार

बोलून बातमी शोधा

हसन मुश्रीफ
नेवाशाची कोरोना पीडा लवकर जाणार
sakal_logo
By
प्रा. सुनील गर्जे

नेवासे : ""कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नेवासे तालुक्‍यात कोरोना तपासणी किट संपल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यावर उपाययोजना केल्या जातील. शनिशिंगणापूर रुग्णालयात बेडची संख्या कशी वाढेल, यासह नेवासे तालुक्‍यातील समस्यांवर योग्य उपाययोजना केल्या जातील,'' असे आश्‍वासन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

मुश्रीफ यांनी काल (ता. 30) नेवासे येथे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आढावा बैठक घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार पांडुरंग अभंग, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार, शिवसेनेचे नेते अशोक थोरे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी उपस्थित होते.

मुश्रीफ म्हणाले, ""कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वी जिल्ह्यात जास्तीत जास्त रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन व ऑक्‍सिजन पुरवठ्यासह इतर सुविधा उपलब्ध करण्याबाबत आरोग्यमंत्री व औषध प्रशासनाशी चर्चा करून मास्टर प्लॅन तयार केला जाईल. लसीकरणासाठी राज्य सरकार 15 मेनंतर पत्रक जाहीर करेल. तोपर्यंत नोंदणी कोड आल्याशिवाय लसीकरणासाठी कोणीही गर्दी करू नये.''

खासदार लोखंडे म्हणाले, की येथील रुग्णांची उपचार व्यवस्था येथेच करा. शनिशिंगणापूर रुग्णालयात आणखी पन्नास बेडची उपलब्ध करावेत. अभंग यांनी रॅपिड टेस्ट किट व रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याकडे लक्ष वेधले. डॉ. करणसिंह घुले यांनीही समस्या मांडल्या. तहसीलदार सुराणा यांनी औषध, ऑक्‍सिजन, रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची माहिती दिली.

सुखधान पोलिसांच्या नजरकैदेत

वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय सुखधान यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना काळे झेंडे दाखविणार असल्याचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत पोलिसांनी त्यांना पोलिस ठाण्याच्या परिसरातच नजरकैद केले. पालकमंत्री गेल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. यावेळी त्यांनी पालकमंत्र्यांच्या विरोधात घोषणा दिल्या.