amc 2020
amc 2020

ते म्हणतात - या कामांवर केंद्र शासनाने उमटवलेली मोहोर

नगर : "अहमदनगर शहरात लोकाभिमुख कामे होत आहेत. शहराला स्वच्छतेबाबत मिळालेले मानांकन ही या कामांवर केंद्र शासनाने उमटवलेली मोहोर आहे. विरोध-टीका होतच असतात. ते विरोधकांचे काम आहे. प्रसिद्धीपेक्षा मी लोकाभिमुख कामे करण्याला महत्त्व देतो,'' असे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी आज स्पष्ट केले. अहमदनगर शहराच्या स्थापना दिनानिमित्त ते "सकाळ'शी बोलत होते. 

वाकळे म्हणाले, "मी महापौर होण्याआधी नगर शहराचे स्वच्छता सर्वेक्षणात देशात 200 पेक्षाही खालचे स्थान होते. शहरातील कचरा, रस्ते व पाणीप्रश्‍नावर नेहमीच ओरड असायची. महापौर झाल्यावर मी पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमधील नगररचना शाखेचे 20 विद्यार्थी नगर शहराचा अभ्यास करण्यासाठी आणले. दोन महिने अभ्यास करून त्यांनी नगर शहराचा विकास कसा करता येईल याचा अहवाल मांडला. त्यांच्याकडून शहराचा विकास कसा करता येईल, याचा अभ्यास केला. शहराचे विकासात्मक परिवर्तन होण्यास आम्ही सुरवात केली. स्वच्छता सर्वेक्षण मोहिमेच्या निमित्ताने शहरातील प्रत्येक भागात घंटागाड्या धावू लागल्या. त्यामुळे रस्त्यावर कचरा टाकणे कमी झाले. रस्त्यावरील कचराही महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी सकाळीच स्वच्छ करत आहेत. त्यामुळे नगर शहर स्वच्छ झाले. स्वच्छता सर्वेक्षणमध्ये मिळालेली मानांकने हे या कामावर केंद्र शासनाने उमटविलेली मोहोर आहे.'' 

अमृत योजनेचे काम सहा महिन्यांत पूर्ण होईल. त्यामुळे शहरातील पाणीप्रश्‍न सुटेल. भुयारी गटाराच्या कामांचे डायमीटरच चुकले होते. ते व्यवस्थित करण्यात आले आहे. हे कामही लवकरच मार्गी लागेल, असे वाकळे यांनी स्पष्ट केले. 

जनता कर्फ्यूमध्ये जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याबरोबर शहराची पाहणी करत असताना लॉकडाउनमध्ये भिकारी व मनोरुग्णांचे हाल होताना पाहिले. यातून स्वखर्चात प्रेमदान चौकात कम्युनिटी किचन सुरू केले. महापालिकेच्या आठ वाहनांतून भिकारी व मनोरुग्णांना जेवणाचे पाकिटे वाटण्यात आली. नगर शहर व उपनगरांतील हातावर पोट असलेल्या नागरिकांना जीवनावश्‍यक साहित्याचे वाटप करण्यात केले. प्रेमदान चौकातील कम्युनिटी किचनमधून नाश्‍तावाटप करण्यात आला. महापालिकेच्या आरोग्य विभागाला थर्मल स्कॅनिंग मशिन भेट दिले. वेळोवेळी महापालिकेतील नगरसेवक व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन लॉकडाउन काळात गरीब व नागरिकांना मदत करण्याच्या सूचना केलेल्या आहेत, असे महापौरांनी सांगितले. 

पावसाळ्यापूर्वी महापालिकेने नालेसफाईची कामे सुरू केली आहेत. दर पावसाळ्यात नगर शहरात दिसणारे रस्त्यावरील पाण्याचे तलाव, पूरस्थिती यंदा दिसू नये यासाठी दक्षता घेण्यात आली आहे. नीलक्रांती चौक ते न्यू आर्टस कॉलेज रस्त्याचे काम झाले आहे. रस्त्याशेजारील भुयारी गटारांचे काम सुरू आहे. पावसाळ्यापूर्वीच शहरातील रस्ता पॅचिंगची कामे करण्यात येत आहेत. लवकरच बुरुडगाव कचरा डेपोतील खतनिर्मिती प्रकल्प सुरू होईल. त्यामुळे शहरातील घनकचऱ्याचा मोठा प्रश्‍न सुटेल, असे महापौर वाकळे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com