esakal | नगर जिल्ह्यात सर्वदूर परतीचा दमदार पाऊस | Rain
sakal

बोलून बातमी शोधा

Nagar Rain
नगर जिल्ह्यात सर्वदूर परतीचा दमदार पाऊस

नगर जिल्ह्यात सर्वदूर परतीचा दमदार पाऊस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोले - शहरासह राजूर, मालेगाव, कोहंडी, मालेगाव, पिंपरकणे आदी परिसरात पावसाने आज दमदार हजेरी लावली. भंडारदरा व मुळा पाणलोटातही पाऊस सुरू होता.

मेघगर्जनेसह अकोले तालुक्यात आज पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. भंडादऱ्याच्या पाणलोटात घाटघर, रतनवाडी येथे धुके दाटले. मध्येच पाऊस-धुके पावसाचा असा खेळ सुरू असल्याने पर्यटकांनी मनमुराद आनंद घेतला. शेतकरी आपल्या शेतात सोयाबीनवर प्लॅस्टिक कागद टाकून त्याचे संरक्षण करताना दिसले. रस्त्यांवरील खड्ड्यांत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांना वाहने चालविण्यास मोठी अडचण निर्माण झाली होती. राजूर ते हिलेदेव रस्त्यावर पाऊस पडल्याने चिखल झाला. त्यामुळे दोन मोटारसायकलींच्या अपघातात दोघे जण जखमी झाले.

राजूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी तक्रार देऊनही या रस्त्यावर मुरूम टाकणे आवश्यक असताना खडी टाकली. अधिकारी व ठेकेदार या बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याने नाराजी व्यक्त करीत माजी सभापती बाळासाहेब देशमुख यांनी, केवळ कागदोपत्री घोडे नाचविण्यापेक्षा प्रत्यक्ष काम सुरू होणे आवश्यक असून, चार दिवसांत काम सुरू न केल्यास खड्ड्यात वृक्षारोपण करून संबंधिताला जाब विचारू.

पारनेर तालुक्यात जोरदार पाऊस

पारनेर - तालुक्यात काही दिवस सलग सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. या पावसामुळे भाजीपाला, तसेच फळबागांचेही मोठे नुकसान झाले. तालुक्यात यंदा सर्वाधिक क्षेत्रावर कांदापीक घेतले गेले आहे.

त्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अतिपावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तालुक्यात यंदा चांगला पाऊस होत असून काही भागात मोठ्या प्रमाणात व सततचा पाऊस पडत असल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले.

हेही वाचा: ड्रोनची किमया न्यारी पाच मिनिटांत एकरावर फवारणी!

यंदा पारनेर, पुणेवाडी, ढवळपुरी, वाघवाडी, सुपे, निघोज, जवळे, कान्हूर पठार, विरोली, वडनेर बुद्रुक, देवीभोयरे, वडझिरे, गुणोरे, राळेगण थेरपाळ, गाडीलगाव परिसरात पावसाने झोडपल्याने पिकांचे तसेच भाजीपाला व फळबागांचे मोठे नुकसान झाले.

तालुक्यातील विविध बागांतील ४० टक्के क्षेत्रावरील कांदा पीक खराब होण्याच्या मार्गावर आहे. तसेच कांदा पिकासह भाजीपाला, फळबागा जनावरांसाठी केलेली पिके यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

निघोज जवळा, राळेगण थेरपाळ या परिसरातील डाळिंबाच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महसूल व कृषी विभागाने पावसामुळे झालेल्या शेतीमालाचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी केली आहे.

तालुक्यात अतिवृष्टी झालेल्या भागातील नुकसानीची महसूल व कृषी विभागाकडून संयुक्त पाहणी करण्यात येईल. नुकसान झालेल्यांना भरपाई देणे गरजेचे आहे. अशा शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील.

- सुधाकर भोसले, प्रांताधिकारी

loading image
go to top