आता बळीराजासाठी हॉस्पिटल, मार्केट कमिट्या सरसावल्यात पुढे

दौलत झावरे
Thursday, 10 September 2020

ओला व कोरडा दुष्काळ, नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकदा शेतकरी आर्थिक अडचणीत असतो. त्यात तो आजारी पडला, तर साध्या उपचारांसाठीही पैसे नसतात. वेळेवर पैसे उपलब्ध न झाल्याने काहींना जीव गमावण्याची वेळ येते.

नगर ः कोरोनामुळे सगळ्यांना रुग्णालयाचे महत्त्व समजले. तालुक्‍याच्या ठिकाणी अद्ययावत रुग्णालये नसल्याचे कोरोनामुळे स्पष्ट झाले. रुग्णालयांअभावी सामान्यांसह शेतकऱ्यांची फरफट सुरू आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील बाजार समित्यांतर्फे शेतकरी व सभासदांसाठी रुग्णालये सुरू करण्याची संकल्पना पुढे आली आहे. त्यावर सध्या जिल्ह्यातील सभापतींचा खल सुरू असून, लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याबाबत हालचाली सुरू आहेत. 

कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात जागा न मिळाल्याने, आजाराचे निदान लवकर न झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागला. त्यात सर्वसामान्यांबरोबरच शेतकऱ्यांचाही समावेश आहे. सरकारी यंत्रणेच्या आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे औषधोपचारांसाठी मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

आगामी काळात अशीच परिस्थिती उद्‌भवल्यास त्याला सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी, त्यातून शेतकऱ्यांचे आरोग्य चांगले राहावे, या दृष्टीने नफ्यात असणाऱ्या जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी शेतकऱ्यांसाठी रुग्णालये उभारण्याचा विचार सुरू केला आहे.

हेही वाचा - कोरोना संकटात कर्जतचा महसूल विभाग आरोग्याच्या मदतीला

ओला व कोरडा दुष्काळ, नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकदा शेतकरी आर्थिक अडचणीत असतो. त्यात तो आजारी पडला, तर साध्या उपचारांसाठीही पैसे नसतात. वेळेवर पैसे उपलब्ध न झाल्याने काहींना जीव गमावण्याची वेळ येते. त्यामुळे शेतकरी व बाजार समितीच्या सभासदांना हक्काचे व सवलतीच्या दरात रुग्णालय असावे, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली. बाजार समितीच्या सभापतींनाही ही संकल्पना योग्य वाटल्याने त्यांच्याकडूनही या दृष्टीने पावले टाकण्यास सुरवात झाली आहे.

तालुकास्तरासह जिल्हा स्तरावरही शेतकऱ्यांच्या हक्काच्या रुग्णालयासाठी सुरवातीला नफ्यातील बाजार समित्यांनी पुढाकार घेऊन ते सुरू करावे व नंतर इतर बाजार समित्यांना रुग्णालयासाठी जिल्ह्यातील दानशूरांनी मदत केल्यास, सर्वच तालुक्‍यांत शेतकऱ्यांसाठी रुग्णालय उभे राहू शकते, असा विश्‍वास व्यक्त होत आहे. 

  • कोणाला मिळतील उपचार? 
  • - ग्रामपंचायत व सेवा सोसायटी सदस्य 
  • - बाजार समितीत खरेदी-विक्री करणारे शेतकरी 
  • - हमाल-मापाडी 
  • - बाजार समितीचे कर्मचारी, व्यापारी 
  • सभापती म्हणतात.. 

 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांसाठी हक्काच्या रुग्णालयासाठी शासनदरबारी प्रयत्न करणार आहोत. रुग्णालयासाठी सरकारने बाजार समित्यांना मदत केल्यास, शेतकऱ्यांचे हक्काचे रुग्णालय भविष्यात सुरू होतील. 
- प्रशांत गायकवाड, पारनेर बाजार समिती 
 

जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या बाजार समित्यांनी शेतकऱ्यांसाठी रुग्णालय सुरू करण्यासंदर्भात विचार करणे गरजेचे आहे. आमचा विचार सुरू आहे. 
-अरुण तनपुरे, राहुरी बाजार समिती 

 

शेतकऱ्यांसाठी रुग्णालय उभारणीची संकल्पना चांगली आहे. या संदर्भात जिल्ह्यातील सर्व सभापतींशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. 
- अभिलाष घिगे, दादापाटील शेळके बाजार समिती, नगर 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The hospital will set up a market committee for farmers