esakal | भिंगारमध्ये आगीचे तांडव INagar
sakal

बोलून बातमी शोधा

भिंगारमध्ये आगीचे तांडव

भिंगारमध्ये आगीचे तांडव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : भिंगार छावणी परिसरातील सदर बाजारालगत असलेल्या नेहरू मार्केटला शुक्रवारी (ता. ९) पहाटे भीषण आग लागली. तीत छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची २४ दुकाने जळून भस्म झाली. व्यावसायिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.

नेहरू मार्केटमध्ये पहाटे लागलेल्या भीषण आगीत बेकरी, टेलरिंग, किराणा, कॉस्मेटिक, कपड्यांच्या दुकानांनी पेट घेतला. थोड्याच वेळात आगीने उग्र रूप धारण केले. आगीच्या आवाजाने परिसरातील नागरिकांना जाग आली. त्यांनी ही माहिती छावणी परिषद आणि अहमदनगर महापालिकेच्या अग्निशामक दलाला दिली. त्यांची वाहने आली, मात्र आगीचे उग्र स्वरूप पाहून त्यांनी मदतीसाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), राहुरी नगरपालिका, तसेच लष्कराच्या वाहन अणुसंशोधन आणि विकास विभागाची (व्हीआरडीई) अग्निशामक वाहने बोलाविली. सर्वांनी मिळून दोन-तीन तासांच्या अथक प्रयत्नातून आग आटोक्‍यात आणली. त्यामुळे परिसरातील दुकाने आणि घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून वाचली.

या आगीची माहिती आमदार संग्राम जगताप, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, छावणी परिषदेचे उपाध्यक्ष वसंत राठोड, छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांना मिळाल्यावर त्यांनी नेहरू मार्केट भागाला भेट दिली. आगीत दुकाने जळालेल्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांच्या उपजीविकेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. आमदार जगताप यांनी या व्यावसायिकांचे म्हणणे ऐकून घेतले व लवकरात लवकर शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गंधे यांनीही शासनाची मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले.

हेही वाचा: Lakhimpur : केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रांच्या मुलाला अटक

राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, सुरेश बनसोडे, अभिजित खोसे, संजय सपकाळ, मतीन सय्यद, सादिक सय्यद, मुसा सय्यद, कलीम शेख, विशाल बेलपवार, संजय खताडे, सागर चवंडके, अजिंक्‍य भिंगारदिवे, दीपक लिपाने, मतीन ठाकरे, सिद्धार्थ आढाव आदींनी व्यावसायिकांना धीर दिला.

आगीच्या घटनेमुळे परिसरात मोट्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. या धुराचा अनेकांना त्रास झाला. या आगीमुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली, हे समजले नाही.

loading image
go to top