esakal | हुंडेकरी अपहरण प्रकरणातील आरोपींना जन्मठेप

बोलून बातमी शोधा

हुंडेकरी अपहरण प्रकरण
हुंडेकरी अपहणप्रकरणातील आरोपींना जन्मठेप
sakal_logo
By
अशोक निंबाळकर

अहमदनगर ः उद्योजक अब्दुल करीम सय्यद (हुंडेकरी) यांचे 25 लाख रुपयांच्या खंडणीसाठी कुख्यात गुंड अजहर मंजूर शेख (वय 36, रा.नगर) व निहाल ऊर्फ बाबा मुशरफ शेख (वय 22, रा. जालना) यांनी अपहरण केले होते. या प्रकरणी दोघांना जन्मठेप व प्रत्येकी दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्यांची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांनी ठोठावली आहे.

शहरातील हुंडेकरी उद्योगसमूहाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते अब्दुल करीम सय्यद (हुंडेकरी) हे 18 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे पाच वाजता नमाज पठणासाठी घरातून बाहेर पडले होते. त्यावेळी अपहरणकर्त्यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांचे अपहरण केले होते. त्यानंतर त्यांचा मुलगा अफरोज अब्दुल करीम सय्यद (हुंडेकरी) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्‍तींविरुद्ध अपहरणाची फिर्याद दिली. तोफखाना, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने वेगवेगळी पथके स्थापन करून शोध सुरू केला.

अपहरणककर्ते हुंडेकरींना कारमधून जालन्याकडे घेऊन गेले. या प्रवासात अपहरणकर्ता अजहर याने हुंडेकरी यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून 25 लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यावर हुंडेकरी यांनी सायंकाळपर्यंत दहा लाखांची व्यवस्था करतो. उर्वरित रक्कम दोन-तीन दिवसांत देतो, असे सांगितले. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी हुंडेकरी यांना एसटी बसने नगरला पाठवून दिले.

पोलिसांचे एक पथक नगर-औरंगाबाद महामार्गावरील जेऊर टोलनाक्‍यावर वाहनांची तपासणी करत असताना त्यांना बसमध्ये हुंडेकरी दिसले. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आरोपी निहाल ऊर्फ बाबा शेख व एका अल्पवयीन मुलास जालन्यातून अटक केली. गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार अजहर शेख (रा. फकीरवाडा, नगर) यास मध्यप्रदेशातील शिवनी येथून अटक केली. चौथा आरोपी फतेहसिद्धीकी अहमद अन्सारी हा अद्याप फरार आहे.

तोफखान पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आर. एन. पिंगळे यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अल्पवयीन आरोपीच्या विरोधात बाल न्यायालयात दोषारोपपत्र पाठविण्यात आले. या खटल्यात पाच साक्षीदार तपासण्यात आले. त्यांच्या साक्षी, परिस्थितीजन्य पुरावे गृहित धरून दोन्ही आरोपींना दोषी धरून खंडणीसाठी अपहरण केल्याबद्दल जन्मठेप व प्रत्येकी दहा हजारांचा दंड ठोठावला आहे.

ऍड. अर्जुन पवार यांनी सरकारतर्फे काम पाहिले. मूळ फिर्यादीतर्फे ऍड. सतीश गुगळे यांनी सहाय्य केले. पैरवी अधिकारी म्हणून एम. ए. थोरात व पोलिस हेड कॉन्स्टेबल मुश्‍ताक शेख यांनी साह्य केले.