esakal | शिक्षक बँकेच्या सत्ताधाऱ्यांनो हिम्मत असेल तर गुन्हे दाखल कराच
sakal

बोलून बातमी शोधा

If the authorities of Shikshak Bank have the courage file a FIR

शिक्षक बँकेवर सत्तेवर असणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे काम प्रभावी विरोधक करत असतात परंतु आत्ताच्या सताधाऱ्यांकडून मात्र विरोधकांना गुन्हे दाखल करण्याची भाषा वापरली जात आहे. हे चुकीचे आहे.

शिक्षक बँकेच्या सत्ताधाऱ्यांनो हिम्मत असेल तर गुन्हे दाखल कराच

sakal_logo
By
सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : शिक्षक बँकेवर सत्तेवर असणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे काम प्रभावी विरोधक करत असतात परंतु आत्ताच्या सताधाऱ्यांकडून मात्र विरोधकांना गुन्हे दाखल करण्याची भाषा वापरली जात आहे. हे चुकीचे आहे.

सत्ताधाऱ्यांनो हिम्मत असेल तर तुम्ही गुन्हे दाखल कराच. सामान्य सभासदाच्या हितासाठी आम्ही गुन्हे अंगावर घ्यायला तयार आहोत, असा इशारा सदिच्छा मंडळाचे नेते संतोष खामकर व बाळासाहेब खिलारी यांनी दिला आहे.

खामकर म्हणाले, जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत सुरु असलेल्या गैरकारभारासंदर्भात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचा कारभार चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न केला. तर सत्ताधारी मंडळी सामान्य सभासदांचा आवाज हुकूमशाही पद्धतीने दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. 
सभासदांवर गुन्हे दाखल करण्याची भाषा वापरत आहेत.

सत्ताधाऱ्यांकडून अशी मुस्कटदाबीची भाषा कोणत्याही सत्ताधारी संचालक मंडळाने केली नाही. मात्र सध्याचे गुरूमाऊली मंडळाचे सत्ताधारी मात्र चुकीची भाषा वापरत आहेत व यावर बँकेच्या मासिक बैठकीत चर्चा घडवून आणत आहेत. ही लोकशाही विरोधी भाषा आहे.

शिक्षक बँक ही सर्व सभासदांची कामधेनू आहे. शताब्दी महोत्सवामध्ये सामान्य सभासदांचा विचार न करता सत्ताधाऱ्यांनी मनमानी पद्धतीने वारेमाप उधळपट्टी केली. सभासदांचा एक रुपयाचाही फायद्याचा विचार केला नाही. उलट त्या पैशातून घड्याळ खरेदी केली. त्याची चौकशी सदिच्छा मंडळाच्या तक्रारीवरून जिल्हा उपनिबंधक यांनी लावली आहे. 

लेखा परिक्षण अहवालातही घड्याळ खरेदीबाबत ताशेरे ओढले असे समजते. त्यामुळे सत्ताधारी मंडळींची पुरती भंबेरी उडाली आहे. त्याच नैराश्यातून ते मासिक मिटिंगमध्ये साधक चर्चा करण्यापेक्षा बाधक गोष्टीवर जास्त चर्चा घडवून आणत आहेत. सभासद हिताच्या गप्पा मारणाऱ्यांनी पाच महिने उलटून गेले तरी व्याजदर कमी करावा यावर चर्चा घडवून आणली नाही.

संपादन : अशोक मुरुमकर