esakal | शहर स्वच्छ न केल्यास पालिकेसमोर कचरा टाकणार 
sakal

बोलून बातमी शोधा

If the city is not cleaned garbage will be dumped in front of the municipality

नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे संबंधित ठेकेदार शहरस्वच्छतेचा ठेका सोडून पळाला. त्यामुळे सण-उत्सवात शहर परिसरात कचऱ्याचे ढीग साचले.

शहर स्वच्छ न केल्यास पालिकेसमोर कचरा टाकणार 

sakal_logo
By
गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे संबंधित ठेकेदार शहरस्वच्छतेचा ठेका सोडून पळाला. त्यामुळे सण-उत्सवात शहर परिसरात कचऱ्याचे ढीग साचले. पुढील चार दिवसांत शहरातील स्वच्छतेचा प्रश्न सोडवावा, अन्यथा पालिकेसमोर कचरा टाकून आंदोलन करू, असा इशारा नगरसेवक अंजूम शेख आणि राजेश अलघ यांनी दिला आहे. 
नाशिक येथील एका कंपनीने 18 लाखांना शहर परिसराच्या स्वच्छतेचा ठेका घेतला होता.

घनकचरा निर्मिती प्रकल्पासाठी सहा लाख रुपये देण्याचे ठरले; परंतु चार महिन्यांत खतनिर्मिती केली नाही. त्यामुळे त्याचे पैसे देता येत नसताना पालिकेने खतनिर्मितीचे पैसे ठेकेदाराला दिले. आता ठेका परवडत नसल्याचे सांगून ठेकेदाराने पळ काढला. पालिकेच्या दोन सर्वसाधारण सभा झाल्या. त्यात स्वच्छतेचा मुद्दा घेतला नाही. पालिकेने स्वच्छतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा मुद्दा नगरसेवक अंजूम शेख यांनी उपस्थित केला. संबंधित ठेकेदार काम सोडून जाणार असताना पालिकेने पर्यायी व्यवस्था उभी करणे गरजेचे होते; परंतु पालिकेकडे कुठलीही पर्यायी व्यवस्था नसल्याने, दिवाळीच्या काळात शहरात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. 

पालिकेने तातडीने विशेष सभा घेऊन, पुढील चार दिवसांमध्ये सर्व शहर स्वच्छ करावे, अन्यथा पालिकेसमोर कचरा टाकणार असल्याचा इशारा नगरसेवक अंजूम शेख, राजेश अलघ, समिना शेख, ताराचंद रणदिवे, जयश्री शेळके यांनी दिला आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image
go to top