किरण काळेंचे नेतृत्व मान्य नसेल तर काँग्रेसमधून चले जाव, डॉ. तांबेंचे गटबाजीवाल्यांना इंजेक्शन

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 6 October 2020

आ.तांबे यांनी नगर शहरामध्ये आज घेतलेल्या या भूमिकेमुळे किरण काळे हेच काँग्रेस पक्षाचे नगर शहराचे नेते असून त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना करावे लागेल. पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या या स्पष्ट आणि कठोर भूमिकेमुळे काळे यांच्या नेतृत्वात वर पुन्हा एकदा पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब करत त्यांना बळ दिले आहे. 

नगर : किरण काळे हेच अहमदनगर शहर काँग्रेसचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात सर्व कार्यकर्त्यांना नगर शहरामध्ये काम करावे लागेल. गटबाजी करणाऱ्यांनी सुधारणा केली नाही तर त्यांच्यावरती पक्षाच्या वतीने कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसचे नेते विधान परिषदेचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी काँग्रेस कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मांडली. 

अहमदनगर शहर जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने कामगार, शेतकरी कायद्या विरोधात आयोजित सह्यांच्या मोहिमेचा शुभारंभ आमदार तांबे यांच्या उपस्थितीमध्ये शहर काँग्रेस कार्यालय झाला. त्यासाठी ते आले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना शहरातील गटबाजी बद्दल प्रश्न विचारले कलिंगडाची बद्दल स्पष्ट शब्दांमध्ये पक्षाची भूमिका मांडली. 

यावेळी शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, ज्येष्ठ नेते दीप चव्हाण, अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष दानिश शेख आदींसह काँग्रेस पक्षाचे शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी बोलताना आ. तांबे म्हणाले की, नगर शहरामध्ये आम्हाला काँग्रेस पक्ष बळकट करायचा आहे. किरण काळे हे अत्यंत चांगले, धाडसी आणि हुशार नेतृत्व आहे. त्यांच्यावरती आम्ही शहराचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे. किरण काळे हे शहर जिल्हाध्यक्ष आहेत. काळे हाच काँग्रेस पक्षाचा अधिकृत गट आहे. बाकी इतर कोणतेही गट पक्षाला अजिबात मान्य नाहीत. सर्व कार्यकर्त्यांना माझं हेच आवाहन आहे की, त्यांनी किरण काळे यांच्या नेतृत्वाखालील शहरामध्ये काम करायचा आहे. 

पण पक्ष बळकट करत असताना आणि स्थिर करत असताना जर काही मंडळी तो होऊ देतच नसतील तर असं करणाऱ्यांची भूमिका ही चुकीचे आहे.

यावेळी पत्रकारांनी गटबाजी करणाऱ्यांवर कारवाई करणार का, असा प्रश्‍न आ. तांबे यांना विचारला असता आ.तांबे म्हणाले की, तसे केले तर निश्चित कारवाई केली जाईल. त्यांनी सुधारणा केली, चांगल्या पद्धतीने वागले तर संधीचा विचार आम्ही करू. पक्षाला कार्यकर्ते हवे असतात. मात्र त्यांना पक्षाला नगर शहरामध्ये स्थिर होऊ द्यायचं नसेल तर योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, अशा कठोर शब्दांमध्ये आ. तांबे यांनी गटबाजी करणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे. 

याबाबत शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात साहेब, आ.डॉ. सुधीर तांबे साहेब, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरामध्ये अत्यंत भक्कम अशी संघटना तळागाळातल्या सर्व घटकांना बरोबर घेत त्याचबरोबर पक्षाच्या जुन्या - नव्यांचा एकत्रित मेळ घालत मी मजबूत करण्यासाठी काम करत आहे. 

काळेंच्या नेतृत्वावर पुन्हा शिक्कामोर्तब 
आ.तांबे यांनी नगर शहरामध्ये आज घेतलेल्या या भूमिकेमुळे किरण काळे हेच काँग्रेस पक्षाचे नगर शहराचे नेते असून त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना करावे लागेल. पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या या स्पष्ट आणि कठोर भूमिकेमुळे काळे यांच्या नेतृत्वात वर पुन्हा एकदा पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब करत त्यांना बळ दिले आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If Kiran Kale's leadership is not acceptable, then leave the Congress