esakal | पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे मेसेज आला तर सावधान!
sakal

बोलून बातमी शोधा

 If a message is received in the name of Pune District Collector, be careful

व्हॉट्‌सऍप ग्रुपवर "पुणे कलेक्‍टरकडून सूचना' या शीर्षकाखाली कोरोनाबाबत सूचना देणारा संदेश पाठविण्यात येत आहे.

पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे मेसेज आला तर सावधान!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर "पुणे कलेक्‍टर यांच्याकडून सूचना' अशा आशयाचा मजकूर असलेला "मेसेज' सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामागील सत्यता जाणून घेतली असता, कोणी तरी खोडसाळपणाने हा मेसेज व्हायरल केल्याचे स्पष्ट झाले. 

मेसेजच्या शेवटी "जिल्हा माहिती कार्यालय, पुणे' असे लिहिले आहे. या मेसेजबाबत पुण्यातील जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांच्याशी संपर्क साधला असता, "हा मेसेज दिशाभूल करणारा आहे. बनावट मेसेज सोशल मीडियावर टाकणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे कोणीही असे मेसेज व्हायरल करू नयेत,' असे आवाहन त्यांनी केले. 

सरग म्हणाले, की काही व्हॉट्‌सऍप ग्रुपवर "पुणे कलेक्‍टरकडून सूचना' या शीर्षकाखाली कोरोनाबाबत सूचना देणारा संदेश पाठविण्यात येत आहे. त्यात वृत्तपत्र बंद करा, शेजाऱ्यांशी संवाद बंद, बेकरी सामान बंद, अशा दिशाभूल करणाऱ्या बाबी नमूद केल्या आहेत. असा कोणताही संदेश पुणे जिल्हा माहिती कार्यालयामार्फत प्रसिद्ध केलेला नाही.

हा संदेश नागरिकांमध्ये गैरसमज पसरविणारा आहे. नागरिकांनी असा संदेश कोणालाही फॉरवर्ड करू नये. कोणी फॉरवर्ड करीत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

प्रशासनाने दिलेल्या अधिकृत सूचना जिल्हा माहिती कार्यालयाच्या ट्‌विटर हॅंडलवर वेळोवेळी देण्यात येतात, तसेच वृत्तपत्रांतून प्रकाशित करण्यासाठी पाठविण्यात येतात, असेही सरग यांनी स्पष्ट केले.