जिद्द व आत्मविश्वास असेल तर क्रीडाविश्वात अमर्याद संधी : अंजली भागवत

आनंद गायकवाड
Tuesday, 13 October 2020

जिद्द व आत्मविश्वासाच्या बळावर खेळामधून करिअरच्या मोठया संधी आहेत, असे प्रतिपादन राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेत्या नेमबाज पद्मश्री अंजली भागवत यांनी व्यक्त केले.

संगमनेर (अहमदनगर) : स्पर्धेच्या युगात प्रत्येक युवक यशाच्या मागे धावत आहे. खेळ व मैदानाकडे करिअर म्हणून बघताना जिद्द व आत्मविश्वासाच्या बळावर खेळामधून करिअरच्या मोठया संधी आहेत, असे प्रतिपादन राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेत्या नेमबाज पद्मश्री अंजली भागवत यांनी व्यक्त केले. जयहिंदच्या ग्लोबल कॉन्फरन्समध्ये क्रीडा व ग्रामीण विकास या विषयावरील परिसंवादात त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, पूर्वी खेळाकडे करिअर म्हणून कोणी फारसे पहात नव्हते. मात्र आपण जिद्द व आत्मविशावासाच्या बळावर नेमबाजीत ऑलिंपीक गाठल्याने, या खेळाला लौकीक प्राप्त झाला. युवकांनी स्वतःची इतरांशी तुलना करण्यापेक्षा स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा. तुमच्यासाठी अमर्याद संधी उपलब्ध आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्यासाठी, स्वत:मध्ये परिपूर्णता हवी. त्यासाठी सातत्य व निष्ठेने परिश्रम हा यशाचा मूलमंत्र असल्याचे त्यांनी सांगितले. 

पद्मश्री शीतल महाजन म्हणाल्या, धाडसी हवाई खेळांमध्ये आजही ही अनेक तरुण सहभागी होत नाहीत. खेळामध्ये निर्णय क्षमता, अचूकता आणि समय सूचकता अत्यंत महत्त्वाची असून सर्व खेळांसाठी आता मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरचे अनेक मार्गदर्शक उपलब्ध आहेत. मात्र याकडे पूर्ण वेळ देऊन आपले करिअर करावे, असा सल्ला त्यांनी दिला. 

धावपटू कविता राऊत म्हणाल्या, ग्रामीण भागातील असूनही धावण्याच्या खेळात खडतर परिस्थितीतून मात केल्याने आज जगाच्या पाठीवर नाव मिळवले. श्रद्धा घुले यांनी घरामध्ये खेळाची कोणती पार्श्‍वभूमी नसतानाही आवड आणि मार्गदर्शनातून यश मिळाल्याचे सांगितले. आरोग्याबरोबर बुद्धीचा विकास होण्यासाठी खेळ आणि कला या विषयाला राज्यशासनाने अधिकाधिक प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी सांगितले.

शेती व ग्रामीण विकास या विषयावर झालेल्या परिसंवादात बोलताना आदर्श गावचे सरपंच पोपटराव पवार म्हणाले, गावगाड्याला योग्य मार्गदर्शन आणि आधुनिकतेची जोड दिली तर अनेक आदर्श गावे निर्माण होतील. ग्रामस्वच्छता, आरोग्य व्यवस्था, शिक्षण यावर काम होणे गरजेचे आहे. तर चंद्रकांत दळवी म्हणाले, खेडी समृध्द झाली तर देश समृध्द होईल.

उत्तमराव जगधने व योगेश पाटील यांनीही शेती या चर्चासत्रात सहभाग घेतला. सूत्रसंचालन उत्कर्षा रुपवते यांनी केले तर डॉ. सुरज गवांदे, अशोक खेरनार यांनी आभार मानले. या वेळी विशाल चोरडिया, अमेरिकेतील क्रीडा समीक्षक केदार लेले, टेबल टेनिसपटू कमलेश मेहता, पुजा राणी, अमेरिकेच्या फ्लोरिया नेहे यांनी सहभाग घेतला.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If there is perseverance and confidence then there are limitless opportunities in the world of sports