राज्यमंत्र्यांच्या आदेशाला पोलिसांकडून केराची टोपली; वळणमध्ये दारु विक्री पुन्हा सुरु

विलास कुलकर्णी
Saturday, 26 September 2020

वळण येथे दारूबंदी करण्यासाठी अवघे गाव एकवटले. ग्रामस्थांसमोर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुखांना सांगितले.

राहुरी (अहमदनगर) : वळण येथे दारूबंदी करण्यासाठी अवघे गाव एकवटले. ग्रामस्थांसमोर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुखांना सांगितले. तीन महिने दारूबंदी झाली. परंतु, कोरोना लॉकडाऊन काळात दारूविक्री पूर्ववत सुरू झाली. राज्यमंत्र्यांच्या आदेशाला राहुरी पोलिसांनी केराची टोपली दाखवली. अवैध दारु विक्रेते शिरजोर झाले. तर, ग्रामस्थ कमजोर पडले.

वळण येथे एक वर्षापासून दारूबंदीसाठी ग्रामस्थ आग्रही आहेत.  ग्रामसभेत दारुबंदीचा ठराव करण्यात आला. अवघे गाव एकवटले.  वळण हद्दीत मुळा नदीच्या काठावर चालणारी अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी संघर्ष उभा राहिला.  पोलीस पाटील व ग्रामस्थांनी आमच्या लहान मुलांना मारहाण केल्याचा आरोप दारु विक्रेत्यांनी केला. त्यामुळे, ग्रामस्थांच्या संतापाचा कडेलोट झाला.  राहुरी पोलीस अवैध दारु विक्रेत्यांना पाठीशी घालतात. अशा भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाल्या.

दरम्यान, विधानसभेच्या निवडणुका झाल्या. राहुरी मतदार संघात प्राजक्त तनपुरे यांच्या रूपाने तरुण, तडफदार आमदार मिळाले.  त्यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लागली.  त्यांनी जनतेचे आभार मानण्यासाठी व त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मोठ्या गावांमध्ये जनता दरबार सुरु केले. वळण येथे जनता दरबारात ग्रामस्थांनी अवैध दारु विक्री बंद करावी. अशी आग्रही भूमिका मांडली. मंत्री तनपुरे यांनी तत्कालीन प्रभारी जिल्हा पोलीस प्रमुख सागर पाटील यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून, वळण येथे अवैध दारु विक्री बंद करण्याचे आदेश दिले. तसे त्यांनी जनता दरबारात जाहीरपणे सांगितले.

राहुरी पोलिसांचे पथक तात्काळ दाखल झाले. अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. तीन महिने दारूविक्री बंद झाली. ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. एप्रिल पासून कोरोना लॉकडाऊन सुरु झाले. तालुक्यात अवैध धंदे वाढले.  वळण येथे बंद झालेली अवैध दारु विक्री मागील पाच महिन्यांपासून जोमाने सुरू झाली.  राहुरी पोलिसांच्या अर्थपूर्ण पाठबळावर दारू विक्रेते शिरजोर झाले. राज्यमंत्र्यांचा आदेश राहुरी पोलीस विसरले. दारूबंदीसाठी हे एकवटलेले ग्रामस्थ कमजोर पडले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal sale of liquor at Valan in Rahuri taluka