अवैध धंदे व गुन्हेगारी खपवून घेतले जाणार नाहीत

सुनील गर्जे 
Thursday, 5 November 2020

नेवासे शहरातील पोलिस वसाहत व पोलिस निरीक्षक बंगला जागेची पाहणी करत या ठिकाणी नियोजित पोलिस ठाणे व वसाहतीच्या नूतनीकरणासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.

नेवासे (अहमदनगर) : नेवासे शहरातील पोलिस वसाहत व पोलिस निरीक्षक बंगला जागेची पाहणी करत या ठिकाणी नियोजित पोलिस ठाणे व वसाहतीच्या नूतनीकरणासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. 

पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी नेवासे पोलिस ठाण्याला सदिच्छा भेट देऊन ठाण्याच्या कामकाजाचा आढावा घेतला. दरम्यान प्रभारी पोलिस अधिकारी अभिनव त्यागी यांनी पाटील यांचे स्वागत केले. 

पाटील म्हणाले, "अवैध धंदे व गुन्हेगारी खपवून घेतले जाणार नाही. पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे आढळल्यास तर संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी पाटील यांनी नागरिकांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेण्याच्या सूचनाही उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या. 
दरम्यान अपर पोलिस अधीक्षक व नेवासे पोलिस ठाण्यातील तत्कालीन पोलिस शिपाई यांच्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झालेली कथित संवादाची ऑडिओ क्लिप' विषयी पत्रकारांनी छेडले असता पाटील यांनी हा पोलिस खात्यांतर्गत विषय असल्याचे सांगून यावर चर्चा टाळली. 

पोलिस कुटुंबीयांकडून समाधान व्यक्त
दरम्यान नेहमीच दुर्लक्षित व दुरवस्था झालेल्या पोलिस वसाहतीस भेट देवुन पाहणी करणारे मनोज पाटील हे पहिलेच पोलिस अधीक्षक असल्याने वसाहतीत अनेक समस्यांचा सामना करणाऱ्या पोलीसांसह त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त करत वसाहतीत नक्कीच सुधारणा होतील अशी आशा व्यक्त केली.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal trades and crimes will not be tolerated