
मुळा धरणात चालणारी यांत्रिक बोट सोमवारी (ता. 7) पुन्हा नादुरुस्त झाली.
राहुरी (अहमदनगर) : मुळा धरणात चालणारी यांत्रिक बोट सोमवारी (ता. 7) पुन्हा नादुरुस्त झाली. त्यामुळे धरणापलीकडील वावरथ, जांभळी, जांभूळबन गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला. बोटीची दुरवस्था झाल्याने ती वारंवार नादुरुस्त होते. नवी आधुनिक बोट उपलब्ध करून द्यावी, तसेच धरणात योग्य ठिकाणी पूल उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मुळा धरणात 1972पासून पाणी साठवणे सुरू झाले. त्यामुळे वावरथ, जांभळी, जांभूळबन या गावांना तीन बाजूंनी पाण्याचा वेढा पडला. एका बाजूचा रस्ता पारनेर तालुक्यातून जातो. ग्रामस्थांच्या सोयीसाठी शासनाने होडीची व्यवस्था केली. मात्र, 10 मार्च 2001 रोजी होडी बुडून चौघांना जलसमाधी मिळाली. या दुर्घटनेनंतर तत्कालीन आमदार प्रसाद तनपुरे यांनी पाठपुरावा करून, नवी यांत्रिक बोट आणली; तीही कालबाह्य झाली.
माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या प्रयत्नातून 2012मध्ये सध्याची यांत्रिक बोट मिळाली. मात्र, आता त्यातील बाक तुटले आहेत. कधी इंजिन, तर कधी गिअर बॉक्स, कधी पाण्यात फिरणारा पंखा, असे भाग मागील दोन-तीन वर्षांपासून वारंवार बिघडत आहेत. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नातून बोटीला नवीन गिअर बॉक्स मिळाला. आता गिअर बॉक्स व पंखा फिरविण्याच्या शाफ्टमधील क्वॉटर पिनचा चुरा झाला आहे.
धरणातील बोटीद्वारे जांभळी ते बारागाव नांदूरदरम्यान 15 मिनिटांत प्रवास करून, राहुरीला झटपट पोचता येते. बोट बिघडल्याने ग्रामस्थांना पारनेर व नगर तालुक्यातून 160 किलोमीटरचा खडतर प्रवास करावा लागतो. त्यामुळे नवी बोट व पुलाची मागणी वर्षा बाचकर, रामदास बाचकर, ज्ञानेश्वर बाचकर व ग्रामस्थांनी केली आहे.
बोटीचे चालक अर्जुन पवार यांना काल (मंगळवारी) रात्री अर्धांगवायूचा झटका आला. त्यांना रात्री एक वाजता दवाखान्यात नेताना त्यांच्या कुटुंबाला प्रचंड यातायात करावी लागली. सर्पदंशानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने आतापर्यंत 30-35 जण प्राणाला मुकले. त्यामुळे धरणावर पूल व नवीन बोटीची गरज आहे.
- वर्षा बाचकर, अध्यक्ष, वावरथ-जांभळी महिला संघर्ष समिती
बोटीच्या दुरुस्तीसाठी युद्धपातळीवर कार्यवाही सुरू आहे. येत्या आठ दिवसांत काम पूर्ण करून, बोट पूर्ववत कार्यरत होईल असे प्रयत्न आहेत. ग्रामस्थांच्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत.
- सुनील शिंदे, प्रशासकीय अध्यक्ष, जांभळी ग्रामपंचायत
संपादन : अशोक मुरुमकर