'जाणते राजे' व ‘शेतकऱ्यांचे कैवारी आता गप्प का; विखे पाटलांची ‘या’ नेत्यांवर टीका

आनंद गायकावड
Sunday, 16 August 2020

दूध उत्पादकांचे प्रश्न समजून घ्यायला सरकारमधील मंत्र्यांना वेळच नाही. त्यांचा संपूर्ण वेळ एकमेकांची समजूत काढून सरकार वाचवण्यात जात आहे.

संगमनेर (अहमदनगर) : दूध उत्पादकांचे प्रश्न समजून घ्यायला सरकारमधील मंत्र्यांना वेळच नाही. त्यांचा संपूर्ण वेळ एकमेकांची समजूत काढून सरकार वाचवण्यात जात आहे. एकाची समजूत काढली की दुसरा लांब जातो. त्यामुळे त्यांचे 'तुझ्या गळा माझ्या गळा' असा कारभार सध्या सुरू आहे.

कोणत्याही माळा गुंफा पण दूध उत्पादकांना न्याय न्याय द्या, अशी मागणी करून, शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवून घेणारे जाणते राजे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गप्प बसण्याची भूमिका कशी घेवू शकतातॽ असा खोचक सवाल माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थीत केला.

संगमनेर तालुक्यातील मनोली येथे संकल्प दूध संस्थेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचमहल दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रभाकर चौरे होते.

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरु राज्य सरकारवर जोरदार टीका करताना ते म्हणाले, दराच्या विषयावर राज्य सरकारला दररोज आंदोलनाचे इशारे देणाऱ्या शेतकरी संघटनेचे आंदोलन कुठे दिसत नाही, असा टोला लगावून उसाच्या भावासाठी आक्रमक होणारे शेतकरी संघटनेचे नेते दूध उत्पादकांच्या प्रश्नावर मात्र शांत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

अडचणीत सापडलेल्या दूध उत्पादकांना 10 रूपये अनुदान आणि प्रतिलिटर 30 रुपये दर ठरवून देण्याची मागणी त्यांनी केली. आघाडी सरकारमधील मंत्र्यांचेच दूधसंघ असल्याने दर वाढवून देण्यासाठी त्यांचाच विरोध असल्याचे आता लपून राहीले नाही. दूध उत्पादकांना न्याय देण्यात आता मंत्र्यांचीच अडचण होत असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.

या वेळी दिलीप शिंदे, जिल्हा परिषद सदस्या ॲड. रोहिणी निघुते, कैलास तांबे, रामभाऊ भुसाळ आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inauguration of Milk Society in Sangamner taluka by MLA Radhakrishna Vikhe Patil