चाळींत साठविलेला कांदा सडू लागल्याने आवक वाढली... 

गौरव साळुंके
गुरुवार, 9 जुलै 2020

दर वर्षीप्रमाणे यंदाही शेतकरी कांद्याच्या दरात वाढ होण्याची वाट पाहत आहेत. मात्र, यंदा कमी कालावधीत कांदा सडू लागल्याने शेतकऱ्यांचाही नाइलाज झाला आहे. कमी दरात कांदाविक्री करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. कांद्याला चांगला दर मिळेल, या आशेवर शेतकऱ्यांनी चाळींमध्ये कांदा साठवून ठेवला. आता तोही सडू लागला आहे. त्यामुळे मिळेल त्या भावात शेतकरी कांद्याची विक्री करीत आहेत.

श्रीरामपूर (नगर ) : सध्या कांद्याची मागणी घटली असली, तरी चाळींत साठविलेला कांदा सडू लागल्याने आवक वाढली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून हॉटेल व्यवसाय ठप्प होता. त्यामुळे कांद्याच्या मागणीत मोठी घट झाली. घरगुती वापरासाठी कांदाविक्री सुरू असली, तरी दरात समाधानकारक सुधारणा झालेली नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

दर वर्षीप्रमाणे यंदाही शेतकरी कांद्याच्या दरात वाढ होण्याची वाट पाहत आहेत. मात्र, यंदा कमी कालावधीत कांदा सडू लागल्याने शेतकऱ्यांचाही नाइलाज झाला आहे. कमी दरात कांदाविक्री करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. कांद्याला चांगला दर मिळेल, या आशेवर शेतकऱ्यांनी चाळींमध्ये कांदा साठवून ठेवला. आता तोही सडू लागला आहे. त्यामुळे मिळेल त्या भावात शेतकरी कांद्याची विक्री करीत आहेत. ६०० ते ८०० रुपये क्विंटल दरातून कांदाउत्पादनाचा खर्चही निघत नसल्याचे कांदाउत्पादक दादासाहेब मुंडे यांनी सांगितले. 

उन्हाळी कांदा काढला, त्या वेळी एक ते दीड हजार रुपये क्विंटल दर होता. त्यानंतर लॉकडाउन सुरू झाले. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर दरात सुधारणा होण्याची शक्‍यता होती. मात्र, सध्या ६०० ते ८०० रुपये दर मिळत आहे. चाळींमध्ये साठविलेला ३० टक्के कांदा सडला. त्यामुळे साठवणूक करून काहीच फायदा झाला नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करतात. 

खरिपाची लगबग सुरू असल्याने शेतीपूरक साहित्याची खरेदी सुरू आहे. बियाणे, खते, कीटकनाशके यांच्या खरेदीसाठी पैशांची गरज भासत आहे. त्यामुळे शेतकरी साठविलेला कांदा कमी दरानेही विक्री करीत आहेत. कांद्याची झालेली नासाडी आणि कमी दराने विक्री, यामुळे शेतकऱ्यांना यंदा मोठा आर्थिक फटका बसला. 

पुढील दोन महिने असेच दर राहणार... 

कोरोनामुळे व्यापार मंदावला. कांदाउत्पादकांचे आर्थिक नुकसान झाले. सडण्याच्या भीतीपोटी अनेक शेतकरी साठविलेला कांदा विकतात. त्यामुळे बाजारातील आवक वाढली. मात्र, दर स्थिर आहेत. शिवाय, पुढील दोन महिने हेच दर कायम राहतील, असा अंदाज कांदाव्यापारी किशोर कालंगडे यांनी व्यक्त केला. सध्या तालुक्‍यातून तमिळनाडू, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आदी राज्यांत कांदा पाठविला जात असल्याचेही ते म्हणाले.

संपादन- सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Income has increased due to rotting of onions currently stored