esakal | ऑनलाईन पाकिटमारी वाढली; उत्तरप्रदेश, झारखंडमध्ये स्मार्ट चोरटे कार्यरत
sakal

बोलून बातमी शोधा

Increase in online theft in Shrirampur taluka

सध्याच्या ऑनलाईनच्या जमान्यात खिसे कापण्याची नवी पद्धत समोर आली आहे.

ऑनलाईन पाकिटमारी वाढली; उत्तरप्रदेश, झारखंडमध्ये स्मार्ट चोरटे कार्यरत

sakal_logo
By
गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : सध्याच्या ऑनलाईनच्या जमान्यात खिसे कापण्याची नवी पद्धत समोर आली आहे. परराज्यातील स्मार्ट चोरटे तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेवुन समोरील व्यक्तीच्या बॅंक खात्यातुन लाखो रुपये एका क्षणांत पसार करतात.

त्यामुळे पोलिस प्रशासनाच्या सायबर शाखेकडे ऑनलाईन पाकिटमारीच्या तक्रारी वाढल्या आहेत. मोबाईलवर फोन करुन बॅँकेचा अधिकारी बोलत असल्याचे सांगुन बॅंक खात्याची माहिती विचारतो. विश्वासात घेवुन क्षणांत बॅक खाते रिकामे केल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. 

गेल्या काही वर्षांमध्ये विविध बॅंकांनी ऑनलाईन बँकिंग सुविधेवर भर दिला. त्यामुळे शेकडो ग्राहक आता मोबाईल बॅंकिंग, नेट बॅंकिंग सेवेचा नियमित वापर करतात. परंतु तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेवुन ऑनलाईन पाकिटमारी करणारया स्मार्ट चोरट्यांच्या टोळ्यांचा सुळसुळाट वाढला आहे. 

तरुण पिढीसह नोकरदार आणि व्यावसायिकांना बनावट फोन कॉल करुन खोटी अमिषे दाखवुन ऑनलाईन पाकिटमारी केल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. सहा महिन्यांत शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील 100 हुन अधिक नागरीकांची ऑनलाईन पाकिटमारी झाल्याचे समजते. त्यातील अनेकांच्या बॅक खात्यातील मोठी रक्कम काढल्याने त्यांनी नगर येथील सायबर पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत. 

तालुक्यातील बेलापूर आणि उक्कलगाव येथील काही तरुणांकडुन मैत्रीच्या नावाखाली पैसे उकळ्याच्या घटना ताज्या आहेत. तर कर्ज प्रकरण मंजूरीसाठी थेट नवीदिल्ली येथील स्मार्ट चोरट्यांनी हरेगाव परिसरातील एका तरुणांना सुमारे दिड लाखांना लुटले. याप्रकरणी सदर तरुणाने संबधीत चोरट्यांविरुद्ध आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रारी दिली. परंतू अशा प्रकरणाचा तपास करुन आरोपींचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे.

गेल्या काही महिन्यापासुन ऑनलाईन पाकिटमारीच्या तक्रारी झपाट्याने वाढल्याचे सायबर पोलिसांनी सांगितले. ऑनलाईन पाकिटमारी करणारे स्मार्ट चोरटे उत्तरप्रदेश, झारखंड, बिहार राज्यात कार्यरत आहे. 

बनावट फोन कॉल करुन बॅक खात्याची माहिती घेवुन क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड, डेबिट कार्ड अपडेटसाठी पासवर्ड आणि कार्डवरील क्रमांक विचारतात. बॅक खात्याची माहिती देताच क्षणांत खात्यातुन लोखो रुपये लंपास केली जातात. तसेच सदर माहितीच्य आधारे हजारो रुपयांची परस्पर खरेदी केली जाते. स्मार्ट चोरटे नोकरदारांसह व्यावसायिकांना बनावट फोन काॅल आणि ई-मेलद्वारे आपल्या जाळ्यात ओढतात.

हजारो रुपयांचे बक्षीस लागल्याचे खोटे मेसेज पाठवुन बक्षिस मिळवण्यासाठी शुल्क भरण्यास सांगतात. त्यामुळे आॅनलाईन पाकिटमारीपासुन वाचण्यासाठी नेहमी सर्तक रहावे. मोबाईलला अनलॉक किंवा पासवर्ड ठेवावा. मोबाईल हरवल्यास अथवा चोरीला गेल्यास तातडीने सिमकार्ड ब्लॉक करावे. आॅनलाईन बॅंकिंक सेवा असलेले मोबाईल लहान मुलांकडे तसेच अनोखळी व्यक्तीकडे देवु नये. असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर