गावकीचं इलेक्शन बिलेक्शन ः अपक्षाच्या खेळीने वैतागले दोन्ही पॅनल, पाठिंबा देवून दिशाभूल

विलास कुलकर्णी
Saturday, 9 January 2021

सोशल मीडियाद्वारे, घरोघरी फिरून, नात्यागोत्याची बाहेरगावची माणसे पाठवून मतदारांना वळविण्यासाठी अटोकाट प्रयत्न सुरू झाले आहेत.

राहुरी : तालुक्‍यातील 44 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रचाराचे नारळ फुटले असून, घरोघरच्या प्रचाराने वेग घेतला आहे. अपक्ष उमेदवार कधी एका गटाला, तर कधी दुसऱ्या गटाला पाठिंबा जाहीर करून गुगली टाकत आहेत. त्यामुळे दोन्ही गट चक्रावून जात आहेत. प्रस्थापित नेत्यांविरुद्ध उभ्या राहिलेल्या सामान्य उमेदवारांना मतदारांचा छुपा पाठिंबा लाभत आहे. त्यामुळे प्रस्थापित नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे. 

तालुक्‍यात एकही ग्रामपंचायत बिनविरोध झाली नाही. त्यामुळे सत्ताधारी व विरोधी गटांचे मनसुबे उधळले. बिनविरोध निवडणूक झाली तर आपला नंबर लागेल, या आशेने काहींनी उमेदवारी अर्ज कायम ठेवले. अपक्षांना आपल्या गटाकडे खेचण्यासाठी सत्ताधारी व विरोधी गटांची चढाओढ आता सुरू झाली आहे. काही अपक्ष उमेदवार कधी सत्ताधारी, तर कधी विरोधी गटाला पाठिंबा जाहीर करीत आहेत. अपक्षांच्या या गुगलीमुळे प्रमुख उमेदवार चक्रावून जात आहेत. 

हेही वाचा - सुरत-हैदराबाद रस्ता शेतकऱ्यांना आणणार रस्त्यावर

सोशल मीडियाद्वारे, घरोघरी फिरून, नात्यागोत्याची बाहेरगावची माणसे पाठवून मतदारांना वळविण्यासाठी अटोकाट प्रयत्न सुरू झाले आहेत. रात्रीच्या बैठकांना जोर चढला आहे. काही ठिकाणी प्रस्थापित उमेदवारांविरुद्ध सामान्य उमेदवार उभे ठाकले आहेत. तेथे मतदार सामान्य उमेदवाराला छुपा पाठिंबा देऊन प्रस्थापितांना धडा शिकविण्याची भाषा करीत आहेत.

काही सामान्य उमेदवारांसाठी मतदारांनी गुपचूप वर्गणी गोळा करून, प्रस्थापित नेत्यांची वाट बिकट करण्याचा घाट घातला आहे. 
मागील पाच वर्षे मतदारांकडे पाठ फिरविलेले उमेदवार मतदारांची मनधरणी करताना दिसत आहेत.

ढाबे, हॉटेलांमध्ये जेवणावळी सुरू झाल्या आहेत. मतदारांच्या याद्या चाळून, आमिषाला बळी पडणाऱ्या मतदारांची नावे काढली जात आहेत. निवडणुकीत रंग भरू लागला असून, उमेदवार व त्यांच्या कुटुंबांतील सदस्यांच्या मात्र झोपा उडाल्या आहेत. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Independent candidates heated up the politics of the village