धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण दिल्यास आदिवासींवर अन्याय

आनंद गायकवाड
Wednesday, 7 October 2020

आर्थिक व राजकियदृष्टया सक्षम असणाऱ्या धनगर समाजाचा आदिवासींच्या राजकीय आरक्षणावर डोळा आहे.

संगमनेर (अहमदनगर) : धनगर समाजाची आरक्षण देण्याची मागणी जोर धरीत असताना, या समाजाला आदिवासींचा समावेश असलेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण दिल्यास, तो पारंपरिक आदिवासी समाजावर अन्यायकारक निर्णय ठरणार आहे. त्यामुळे धनगरह समाजाला या प्रवर्गातून आरक्षण न देण्याची मागणी एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा नेवून दिलेल्या निवेदनात करण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, काही वर्षापासून धनगर व इतर समाज आदिवासी समाजाचा समावेश असलेल्या अनूसुचित जमाती प्रवर्गातून घटनाबाहय पध्दतीने आरक्षण मागत आहेत. स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांच्या कालखंडापासून दारिद्र्य उपेक्षा व हलाखीच्या परिस्थितीत जीवनाचा गाडा रेटणाऱ्या आदिवासींवर या राजकिय डावपेचामुळे अन्याय होणार आहे. डोंगरदऱ्यात व जंगलात राहत असल्याने, शैक्षणिक प्रवाहापासून अद्यापही दूर असलेल्या या समाजाच्या अज्ञानाचा फायदा घेतला जाण्याची शक्यता आहे.

आर्थिक व राजकियदृष्टया सक्षम असणाऱ्या धनगर समाजाचा आदिवासींच्या राजकीय आरक्षणावर डोळा आहे. यातून राजकिय लोकही धनगर समाजाची फसवणूक करीत असल्याने, या भुलभुलैयावर धनगर समाजानेही विश्वास ठेवू नये. आदिवासी समाज कोणत्याही परिस्थीतीत हक्काच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. एकलव्य संघटनेच्यावतीने संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून मागणीचे निवेदन नायब तहसीलदार लक्ष्मण मेंगाळ यांना देण्यात आले.

आदिवासी नेते शिवाजीराव ढवळे यांच्या नेतृत्वाखालील एकलव्य संघटनेचे जिल्हा संघटक जालिंदर गवळी, तालुकाध्यक्ष अनिल बर्डे, उपाध्यक्ष रमेश खैरे, टायगर फोर्सचे तालुकाध्यक्ष राजेंद्र बर्डे, युवा उपाध्यक्ष प्रकाश बर्डे, तालुका संघटक बाळासाहेब दरेकर, आकाश बर्डे, सुनिल बर्डे, विष्णु बर्डे, उत्तम जाधव, अंकुश बोरसे, योगेश बोरसे, दादू बर्डे, संतोष बर्डे, बाळासाहेब पवार, बाबासाहेब बर्डे, युवराज महाराज, आनंद बर्डे, संदिप बर्डे, जालिंदर बर्डे आदिंसह मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादन : सुस्मिता वडतिले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Injustice on tribals if reservation is given to Dhangar community from Scheduled Tribes category