एका मोकळ्या ट्रेलरला काढण्यासाठी लावले दोन ट्रॅक्टर; रोजगार हमीच्या कामाची चौकशी करण्याची मागणी

अशोक मुरुमकर
Sunday, 18 October 2020

बिटरगाव (श्री) (ता. करमाळा) येथील जुना करमाळा रस्ता रोजगारहमीत मंजुर झाला होता. मात्र, अद्यापही हा रस्ता पुर्ण झाला नसल्याने शेतकऱ्यांना चिखलातून मार्ग काढावा लागत आहे.

अहमदनगर : बिटरगाव (श्री) (ता. करमाळा) येथील जुना करमाळा रस्ता रोजगारहमीत मंजुर झाला होता. मात्र, अद्यापही हा रस्ता पुर्ण झाला नसल्याने शेतकऱ्यांना चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे या रस्त्यावर मोठ्याप्रमणात चिखल झाला आहे. त्यामुळे चालणेही अवघड झाले आहे. एक मोकळा टेलर काढण्यासाठी चक्क दोन ट्रॅक्टर लावावे लागले आहेत. हा रस्ता पूर्ण झाल्याशीवाय गावात कोणतेही रोजगार हमीचे काम करु नये व झालेल्या सर्व कामांची चौकशी करावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.

बिटरगाव (श्री) येथून करमाळ्याला जाण्यासाठी पूर्वी ज्या रस्त्याचा वापर केला जायचा त्याकडे सध्या दूर्लक्ष झाले आहे. या रस्त्याचा वापर परिसरातील शेतकऱ्यांसह पांडुरंग वस्ती, पोथरे व करमाळ्याला जाण्यासाठी केला जातो. सध्या करमाळ्याला जाण्यासाठी दुसरा रस्ता आहे. मात्र, पांडुरंग वस्ती व पोथरे शिवारात जाण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्याचे खडीकरण व्हावे, म्हणून काही दिवसांपूर्वी बिटरगाव (श्री) हद्दीत रोजगारहमीतून मंजुर झाला होता. त्याचे कामही सुरु झाले होते. मात्र, काही शेतकऱ्यांनी आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली.

जुना करमाळा हा रस्ता शेतीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. सध्या शेतीची कामे सुरु असून शेतकऱ्यांना कामे करण्यासही अडचणी येत आहेत. पावसामुळे मळणीयंत्र शेतात नेहता येत नाही, त्यामुळे या भागातील शेतकरी डोक्यावर पीक घेऊन रस्त्याच्याकडेला आणत आहेत. सध्या ऊसाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे, अशात ऊस तोड कामगार आणायचे म्हटलं तरी रस्ता नाही. त्यामुळे मोठे नुकसान होणार आहे. याकडे गाभीर्याने लक्ष देऊन रस्त्याचे काम त्वरीत करावे, अन्यथा आंदोलन केले जाणार आहे.
हा रस्ता महत्त्वाचा असताना सुद्धा याकडे दुर्लक्ष होत आहे. ज्या शेतकऱ्यांनी रस्ता आढवला आहे. तो तसाच सोडून दोन किलोमीटरपर्यंतचा रस्ता तरी चांगला करणे आवश्‍यक आहे. हा रस्ता जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत गावातील इतर रस्त्याचे रोजगारहमीतून काम करु नये.

गावात रोजगारहमीच्या कामात मोठागैरव्यहवार झाला आहे. त्या कामांचीही त्वरीत चौकशी करावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी तहसीदार समीर माने यांच्याकडे केली आहे. एका कामाची मंजुरी असताना त्यावर दुसरेच काही करणे व खोट्या सह्या करणे, असे प्रकार झाल्याची शंका व्यक्त केली जात असून याची त्वरीत चौकशी व्हावी, अन्यता रस्त्यावर उतरणार असल्याचे या भागातील शेतकऱ्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inquire about employment guarantee work in Bittergaon in Karmala taluka