बापरे! नेवासेत ४४१ अंगणवाड्यांमध्ये ‘ऐवढी’ बालके कुपोषित

सुनील गर्जे 
Friday, 7 August 2020

अंगणवाडीतील बालकांचे वजन, उंची यांच्या मोजमापाला सुरवात झाली आहे. तीन ते सहा वर्षांपर्यंतच्या जवळपास 13 हजार 884 बालकांची शारीरिक देखरेख करण्यात येणार आहे.

नेवासे (अहमदनगर) : अंगणवाडीतील बालकांचे वजन, उंची यांच्या मोजमापाला सुरवात झाली आहे. तीन ते सहा वर्षांपर्यंतच्या जवळपास 13 हजार 884 बालकांची शारीरिक देखरेख करण्यात येणार आहे. 

तालुक्‍यातील जवळपास 441 अंगणवाड्यांमध्ये 1 जुलैपासून या उपक्रमाला सुरवात झाली. त्यात 6 महिने ते तीन वर्षांची 13 हजार 884 बालके, आणि तीन ते सहा वर्षांपर्यंतची 17 हजार 323 बालके, अशा एकूण 31 हजार 207 बालकांचा समावेश आहे. 

दरमहा नियमितपणे बालकांची देखरेख करण्यात येते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लॉकडाउनमध्ये गेल्यामुळे मुलांचे वजन, उंचीचे मोजमाप राहिले होते. मार्चमध्ये 33 हजार 62 बालकांचे वजन, उंची घेतली होती. या देखरेखीमुळे बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण समजण्यास मदत होते. 

आवश्‍यक त्या प्रमाणात संबंधित बालकांच्या कुटुंबीयांना आहाराचे प्रमाण सांगून, कुपोषण रोखण्यासाठी मदत होते. मिनी अंगणवाडी सेविका 55, नियमित अंगणवाड्यातील 380 सेविका व मदतनिसांच्या मदतीने देखरेख ठेवण्याचे काम होणार आहे. मार्चमधील पाहणीत मध्यम कुपोषित बालकांची नोंद सहा महिने ते सहा वर्षांपर्यंत करण्यात आली आहे. लॉकडाउननंतर प्रमाण किती आढळून येते, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. 

बेबी केअर किटचे 734 मातांना वाटप 
तालुक्‍यातील प्रथम प्रसूती असलेल्या 734 मातांना बेबी केअर किटचे वाटप करण्यात आले. किटमध्ये बाळाचे कपडे, मच्छरदाणी, बेडशीट, साबण, तेल, तापमापी आणि खेळण्यांचा समावेश आहे. किटचे व्यवस्थित वाटप होण्यासाठी लाभार्थी महिलेसोबत फोटो काढून कार्यालयाला पाठविण्याचा आदेश देण्यात आला आहे. 

बालविकास प्रकल्प अधिकारी सुनील अंकुश म्हणाले, प्रत्येक अंगणवाडीत एका दिवशी 5 बालकांचे वजन, उंची घेण्यात येते. सामाजिक अंतर ठेवले जात असून, बालकांचा ऑनलाइन अहवाल पाठविण्यात येतो. कोरोना काळात जवळपास 833 बालकांची वाढ झाली असून, वजन- उंचीच्या देखरेखीपासून एकही बालक वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली आहे. 

हे ठेवणार देखरेख 
- अंगणवाडी सेविका- 380 
- पर्यवेक्षिका- 13 
- मिनी सेविका- 53 
- मदतनीस- 360 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inspection of 13000 children in 441 Anganwadis in Nevasa taluka