हे मोबाईल अॅप तुम्हाला करील कर्जबाजारी, रिझर्व्ह बँकेने दिल्या सूचना

मनोज जोशी
Friday, 25 December 2020

कोपरगाव तालुक्‍यातील अनेक तरूण ऑनलाइन सावकारीच्या जाळ्यात सापडल्याचे वृत्त "ई सकाळ'ने प्रसिद्ध केले होते. रिझर्व्हे बॅंकेने ऑनलाइन सावकारीवर कारवाईचा बडगा उगारल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे. 
 

कोपरगाव : कमी कागदपत्रे, जामीनदाराची गरज न घेता मोबाईल ऍपच्या साहाय्याने झटपट कर्जवाटप करणाऱ्या कंपन्यांना रिझर्व्ह बॅंकेने चाप लावला आहे.

शासनाच्या बॅंकिंग व नॉनबॅंकिंग अंतर्गत किंवा राज्य सरकारच्या सावकारी कायद्याच्या अखत्यारित नसलेल्या, कुठलीही परवानगी न घेता, ग्राहकांना फसविणाऱ्या मोबाईल ऍपविरुद्ध तक्रारी करण्याचे आवाहन केले आहे. 

रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे, की अनधिकृत डिजिटल मोबाईल ऍपद्वारे कर्जवितरण कंपन्या ग्राहकांची लूट करीत असल्याच्या तक्रारी रिझर्व्हे बॅंकेकडे येत होत्या. बॅंकिंग व नॉनबॅंकिंग अर्थपुरवठा करणाऱ्या संस्था रिझर्व्ह बॅंकेकडे नोंदणीकृत आहेत. फसवणूक करणाऱ्या कंपन्यांबाबत माहिती घ्यावी.

ग्राहकांनी आपापले केवायसी कागदपत्रे अनोळखी व्यक्तीला देऊ नये, अनधिकृत ऍपला शेअर करू नयेत. अनधिकृत ऍपची तक्रार रिझर्व बॅंकेच्या संकेतस्थळावर करावी, डिजिटल कर्जवाटप करणाऱ्या ऍपवर प्रथमदर्शनी बॅंक किंवा नॉन बॅंकेचे नाव नमूद करावे. 

दरम्यान, कोपरगाव तालुक्‍यातील अनेक तरूण ऑनलाइन सावकारीच्या जाळ्यात सापडल्याचे वृत्त "सकाळ'ने प्रसिद्ध केले होते. रिझर्व्हे बॅंकेने ऑनलाइन सावकारीवर कारवाईचा बडगा उगारल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Instructions given by the Reserve Bank regarding mobile