
सावेडी उपकार्यालयात एक मोठा बंब आहे. उर्वरित एक मोठा व दोन लहान बंब माळीवाडा येथील मुख्य कार्यालयात आहेत. शिवाय दोन दुचाकीही आहेत.
नगर ः आपत्तीपासून नगरकरांची सुरक्षा करायची झाली, तरी महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे पुरेशी वाहने नाहीत. महापालिकेच्या स्थायी समितीसमोर नवीन वाहन खरेदीचा प्रस्ताव मांडला. त्याच वेळी महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे पुरेसे मनुष्यबळही नाही.
राज्य सरकारने 125 जणांचा स्टाफ पॅटर्न मंजूर केलेला असताना, केवळ 28 कर्मचारीच कार्यरत आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांची सुरक्षा रामभरोसे झाली आहे.
नगर शहर 66 चौरस किलोमीटर परिसरात पसरले आहे. 2011च्या जनगणणेनुसार 3 लाख 50 हजार 859 लोक राहतात. नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे एक मुख्य व दोन उपकार्यालये आहेत. त्यातील केडगाव येथील उपकार्यालय वाहनांअभावी बंद पडले आहे.
सावेडी उपकार्यालयात एक मोठा बंब आहे. उर्वरित एक मोठा व दोन लहान बंब माळीवाडा येथील मुख्य कार्यालयात आहेत. शिवाय दोन दुचाकीही आहेत. मात्र, दुचाकींचा वापर होत नसल्याने, त्या धूळखात पडल्या आहेत.
स्थायी समितीकडे मोठ्या वाहन खरेदीचा प्रस्ताव मांडला आहे. पूर्वी वाहनखरेदीसाठी चार वेळा ई-निविदा प्रसिद्ध झाली. मात्र, निविदेला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर आता टाटा वाहनाच्या चेसिस खरेदीसाठी ई-निविदा पाठविण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
ही प्रस्ताव 23 लाख रुपयांचा आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यास महिनाभरात वाहनखरेदी होणार आहे. त्यानंतर या वाहनाला बॉडी बसविण्यासाठी 27 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
वाहने आली, तरी अग्निशमन विभागामागील शुक्लकाष्ट संपणार नाही. कारण पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. राज्य सरकारने 2016मध्ये अग्निशमन विभागासाठी 125 जणांचा स्टाफिंग पॅटर्न मंजूर केला आहे. मात्र, अग्निशमन विभागाची नियमावलीच महाराष्ट्र अग्निशमन सेवा विभागाने तयार केलेली नाही. त्यामुळे महापालिकेच्या अग्निशमन विभागात केवळ 28 अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील आठ कर्मचाऱ्यांनीच 1990मध्ये सांताक्रुझ येथील राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतले आहे. त्यातील दोन कर्मचारी येत्या एक-दीड वर्षात निवृत्त होणार आहेत.
अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांना फायरमनची कामे करावी लागत असली, तरी पगार मात्र बिगाऱ्याचा मिळत आहे. कोरोना संकटात सोडीयम हायपोक्लोराईड फवारणीसाठी अग्निशमन विभागातील कर्मचारीच अग्रेसर होते. मात्र, कर्मचाऱ्यांना कोणी कोरोनायोद्धा समजले नाही, अशी खंत त्यांच्यात आहे.
अग्निशमन विभागाची नियमावलीच महाराष्ट्र अग्निशमन सेवा विभागाने तयार केलेली नाही. ही नियमावली तयार करण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागाने चार-पाच वेळा पाठपुरावा केला आहे. मात्र, अजूनही नियमावली तयार झालेली नाही. त्यामुळे कंत्राटी पद्धतीने 20 फायरमन, चार वाहनचालक व दोन सबऑफिसर ही पदे भरण्यात येणार आहेत.
- शंकर मिसाळ, अग्निशमन विभागप्रमुख, महापालिका