२६ मार्चला निकाल अन्‌ १ एप्रिलला नोकरी; १९५२ मधील एका शिक्षकाची रंजक कहाणी

अशोक मुरुमकर
Tuesday, 1 September 2020

सध्या नोकरीच्या शोधात अनेक तरुण आहेत. मात्र, कितीही शिक्षण झालेले असले तरी नोकरीसाठी स्पर्धा आहे.

अहमदनगर : सध्या नोकरीच्या शोधात अनेक तरुण आहेत. मात्र, कितीही शिक्षण झालेले असले तरी नोकरीसाठी स्पर्धा आहे. एक काळ असा होता की नोकरीसाठी कोण इच्छुक नव्हते. निकाल लागला की लगेच नोकरी मिळत होती. यातूनच १९५२ मध्ये नोकरी कशी लागली याची एका शिक्षकाची रंजक कहाणी आहे. ८० वर्षाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक त्यांच्या नोकरीचा प्रवास सांगत आहेत. हंबीरराव मुरुमकर असं त्यांचे नाव आहे.

अतिशषय कष्टाने त्यांनी शिक्षण केले. त्याला आर्थिक परस्थितीमुळे घरातून विरोध झाला, पण कष्ट आणि प्रमाणिकपणा यामुळे कष्टाचे चिज झाल्याचे ते सांगत आहेत.
मुरुमकर हे करमाळा तालुक्यातील बिटरगाव (श्री) येथील आहेत. त्यांना पाच मुलं आणि दोन मुली आहेत. त्यांचे सातवीपर्यंत शिक्षण झाले आहे. २६ मार्च १९५२ ला त्यांचा चौथीचा निकाल लागला आणि चौथ्या दिवशी म्हणजे १ एफ्रिलला त्यांना शिक्षकाची नोकरी लागली. घरची परस्थिती हालाखीची असल्यामुळे ते वाडील व चुलत्याबरोबर कामाला जात.

गावातील पाटलाच्या मळ्यात ते जनावरे सांभाळत होते. पाटलाची मुलं करमाळ्यात शाळेत होती. मात्र, त्यांना कोणी जोडीदार नव्हते. म्हणून पाटलाने मुरुमकर यांना मुलाबरोबर करमाळ्यात ठेवण्याची व्यवस्था केली. त्यानंतर त्यांना थेट तिसरीच्या वर्गात शाळेत टाकण्यात आले. त्यावेळी पावकी निमकी होती. त्यांचे गणीत चांगले होते. शिक्षकांनी त्यांची हुशारी पाहून तिसरीला टाकण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या परस्थितीमुळे त्यांना शाळेत टाकण्याला वडिलांनी विरोध केला होता. मात्र, पाटलाने सर्व खर्चाची जबाबदारी उचलली त्यामुळे शाळेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे ते सांगत आहेत. 

मुरुमकर म्हणाले, सातवीची परिक्षा बार्शीला होती. त्याला १५ रुपये खर्च होता. मात्र, तेव्हा तेवढे पैसे मिळावेत म्हणून वडिलांना साल धरले होते. मात्र, मध्येच पैशाची गरज लागली तेव्हा मालकाने परीक्षेवेळीच पैसे दिले नाहीत. म्हणून गावातील काही मंडळींने उसने पैसे दिले. तेव्हा त्यांना पाडळी येथे माळावर विहीर फोडण्यासाठी कामाला येण्याची अट घातली. पैशाची गरज असल्याने ती अट स्विकारली अन्‌ परिक्षा दिली. परिक्षा देऊन आल्यानंतर ठरल्याप्रमाणे त्यांच्याकडे कामाला जाऊ लागलो. त्यानंतर २६ मार्चला निकाल लागला अन्‌ पास झालो. त्यानंतर लगेच नोकरी लागली. 

करमाळा, पाडळी, बाळेवाडी, कामोणे व जिंती येथे नोकरी केली असल्याचे ते सांगत आहेत. करमाळ्याला मुलांना शिकवण्यासाठी चालत जावे लागत होते. गावापासून करमाळा १० किलोमीटरवर आहे. सकाळी सात वाजता शाळा असायची. उन- वारा- पाऊस असला तरी शाळेची वेळे कधीच चुकू दिली नाही. प्रमाणिकपणा कष्ट यावर आपला विश्‍वास असेल तर शुन्यातून सुद्धा प्रगती करता येऊ  शकते असं ते सांगत आहेत. माझ्याबद्दल कधीच कोणाचा गैरसमज होणार नाही. याची मी काळजी घेत होतो. त्यामुळे माझ्यावर विश्‍वास वाढत गेला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An interesting story of a teacher who got a job as a teacher in 1952