सोन्यातील गुंतवणूक कशी ठरली फायदेशीर.. तुम्हीच पाहा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 1 July 2020

सोन्यातील गुंतवणूक भारतीय लोकांना नेहमी खात्री देणारी वाटते. हे मागील 50 वर्षांतील सोन्यातून मिळालेल्या परताव्याने सिद्ध झाले आहे.

कोपरगाव : शेअर्स, मॅच्युअल फंड व इतर क्षेत्रातील गुंतवणूकीपेक्षा कमी कालावधीत सोन्यात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरत असल्याचे दिसत आहे. कोरोनासारख्या कठीण काळात सर्वसामान्यांना सोनेच पैसा देऊन गेल्याची माहिती येथील सोन्याचे व्यापारी व विसपुते सराफ पेढीचे संचालक दीपक विसपुते यांनी दिली. 

ते म्हणाले, की संपूर्ण जगासह देशात कोविड-19 आजाराने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत देश लॉकडाऊन झाला. अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले. अनेकांना नोकरी गमवावी लागली. लोकांची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली. जागतिक बाजारपेठ कोसळल्यामुळे शेअर्स, म्युच्युअल फंड यांच्यातील गुंतवणुकीमध्येही मोठा फटका बसून, अनेकांचे नुकसान झाले. 

हेही वाचा : इंदोरीकर महाराजांना वाढता पाठिंबा.. 

मागील काही वर्षांत पीएमसी बॅंक, पंजाब नॅशनल बॅंक, अनेक सहकारी बॅंका व पतसंस्था, यांमध्ये झालेली काही प्रकरणे, ठेवीवरील कमी होत चाललेला व्याजदर, यांमुळे बॅंकांमधील पैशाही किती प्रमाणात परतावा देऊ शकतो, याबाबत गुंतवणूकदारांच्या मनात शंका उत्पन्न होत आहे. 

सोन्यातून सर्वाधिक परतावा 

विसपुते म्हणाले, की अशा परिस्थितीत सोन्यातील गुंतवणूक भारतीय लोकांना नेहमी खात्री देणारी वाटते. हे मागील 50 वर्षांतील सोन्यातून मिळालेल्या परताव्याने सिद्ध झाले आहे. अगदी अलिकडच्या काळाचा विचार जरी केला, तरी 2005 मध्ये सोन्याचा भाव पाच हजार रुपये प्रति तोळा होता. तो केवळ 15 वर्षांत 50 हजार रुपये प्रति तोळा झाला. म्हणजे 15 वर्षांत 10 पटीने परतावा गुंतवणूकदारांना मिळाला आहे. ज्या लोकांनी सोन्यात गुंतवणूक केली, अशा लोकांना आज कोरोनाच्या कठिण काळात हातातील सोने मोडून तातडीने बऱ्यापैकी पैसा हाती येत आहे. तो उदरनिर्वाहासाठी उपयोगी पडत आहे. 

आजही सोन्यातील गुंतवणूक फायद्याची 

आजही आपण सोन्यात गुंतवणूक केली, तरी पुढील काही वर्षांनी येणाऱ्या संकटांना आपण निश्‍चित सामोरे जाऊ शकतो. कष्टाने कमावलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतविणे व त्यातून किती परतावा मिळतो, हेदेखील पाहणे आवश्‍यक आहे, असे मत विसपुते सराफ पेढीचे संचालक दीपक विसपुते यांनी व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Investing in gold turned out to be profitable during the Corona period