शिक्षक बँकेत घड्याळ खरेदीत अनियमितता, रोहकले गटाचा आरोप

दौलत झावरे
Sunday, 6 December 2020

घड्याळ खरेदी करताना बॅंकेच्या संचालक मंडळाने व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संगनमताने अत्यंत नियोजनपूर्वक अतिशय चुकीच्या पद्धतीने व्यवहार केलेला आहे.​

नगर ः जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या संचालक मंडळाने शताब्दी भेटीच्या नावाखाली खरेदी केलेल्या घड्याळ खरेदी व्यवहारात मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाली आहे. त्या व्यवहाराच्या चौकशीकरिता व घड्याळ खरेदी व्यवहाराची कागदपत्रे मिळावीत व कारभाराची चौकशी व्हावी, मागणीसाठी रोहोकले प्रणित गुरुमाऊली मंडळाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर घंटनाद आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. 

या बाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, घड्याळ खरेदी करताना बॅंकेच्या संचालक मंडळाने व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संगनमताने अत्यंत नियोजनपूर्वक अतिशय चुकीच्या पद्धतीने व्यवहार केलेला आहे.

या व्यवहारात लाखो रुपयांचा गैरव्यवहार, अनियमितता व अपहार झालेला आहे.

वेळोवेळी पाठपुरावा करूनही ही बाब न्यायप्रविष्ठ असल्याचे धादांत खोटे कारण देत कागदपत्रे देणेबाबत उपनिबंधक कार्यालयाने शिक्षक बॅंकेला दोन वेळा लेखी आदेश देऊनही टाळाटाळ व दिरंगाई केली आहे. ज्यामुळे उपनिबंधक कार्यालयाच्या लेखी आदेशांचा अवमान झाला आहे.

जिल्हा उपनिबंधकांनी बॅंकेच्या कारभाराची चौकशी करून कारवाई करावी, या मागणीसाठी 22 डिसेंबरला जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करम्याचा इशारा दिलेला आहे.

या निवेदनावर विकास डावखरे, संजय शेळके, प्रवीण ठुबे, राजू थोरात, गणेश वाघ, संजय शिंदे, कारभारी खामकर, संतोष निमसे, बाळासाहेब वाबळे, सुहाग साबळे आदींच्या सह्या आहेत. 

 

शिक्षक बँकेतील पदाधिकाऱ्यांचा कारभार पारदर्शक आहे. कोणतीही अनियमितता नाही. विरोधकांच्या आरोपांची चौकशी व्हावी, त्याचे आम्ही स्वागत करतो. घड्याळात त्यांचा फोटो असता तर आरोप झाले नसते. चौकशीत सत्य बाहेर येईल.

- राजू रहाणे, अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक बँक

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Irregularities in the purchase of watches at the teacher bank