esakal | शिवसेनेने दोन्ही काँग्रेससोबत सरकारमध्ये राहणे धोकादायक : आठवले
sakal

बोलून बातमी शोधा

It is dangerous for Shiv Sena to stay in government with Congress and NCP

नगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील खासदार झाले.

शिवसेनेने दोन्ही काँग्रेससोबत सरकारमध्ये राहणे धोकादायक : आठवले

sakal_logo
By
सतिश वैजापूरकर

शिर्डी (अहमदनगर) : नगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील खासदार झाले. पण, पुढच्या लोकसभा निवडणुकीत मी शिर्डीतून पुन्हा येईन, पुन्हा येईन आणि लवकर परत जाणार नाही,'' अशा शब्दांत केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिडीतून पुन्हा लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले. 

शिर्डीत मंत्री आठवले म्हणाले, ""माजी खासदार (कै.) बाळासाहेब विखे पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने नगर दक्षिण लोकसभेची जागा सोडली असती, तर उत्तरेत माझा पराभव झाला नसता. चार-पाच लाखांच्या मताधिक्‍यांनी मी विजयी झालो असतो. त्यांच्यासाठी जागा सोडली नाही आणि "ॲट्रॉसिटी'च्या मुद्‌द्‌यावर अपप्रचार झाल्याने माझा येथे पराभव झाला. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. तिकडे भाजपचे डॉ. विखे पाटील खासदार झाले. त्यामुळे मला इकडे यायला काही अडचण नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकरात लवकर इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारावे. तुम्ही उभारणी करा, उद्‌घाटन आम्ही करू, अशी कोटी करीत शिवसेनेने दोन्ही कॉंग्रेससोबत सरकारमध्ये राहणे धोकादायक आहे. त्यांचे आमदार फुटू शकतात, अशी शक्‍यता मंत्री आठवले यांनी व्यक्त केली. 

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या "आ देखे जरा, किसमे कितना है दम..' या ट्‌विटकडे लक्ष वेधले असता, आठवले यांनीही "हम भी दिखायेंगे, हम नही है किसीसे कम...!' अशी कोटी केली. 

ईडीबाबत काय वाटते, या प्रश्‍नावर ते म्हणाले, की मी बिडी पित नाही, त्यामुळे मला ईडीची भीती वाटत नाही. पश्‍चिम बंगालमध्ये दलित मतांचे प्रमाण 36 टक्के आहे. त्यामुळे भाजपला विधानसभेच्या 200 जागा मिळतील, असा दावाही त्यांनी केला. बैठकीपूर्वी भाजपचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांच्या हस्ते आठवले यांचा सत्कार करण्यात आला. नगरसेवक सुजित गोंदकर, भाजपचे शहराध्यक्ष सचिन शिंदे, रामभाऊ कोते, ज्ञानेश्वर गोंदकर, दिलीप वाघमारे आदी उपस्थित होते. 

मी पुन्हा मंत्री होणार 
आठवले म्हणाले, की वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मला फोन आला. मी त्यांना म्हणालो, की तुम्ही पुढच्या निवडणुकीत पुन्हा पंतप्रधान होणार. मनात म्हणालो, म्हणजे मीदेखील पुन्हा मंत्री होईल. 

संपादन : अशोक मुरुमकर