अकोलेत आरोग्य अधिकारी नसल्याने कोविड सेंटर सुरु करणे शक्य नाही

शांताराम काळे
Monday, 21 September 2020

कोविड सेंटर उभारणे गरजेचे असले तरी त्यासाठी आरोग्य अधिकारीच नसल्याने कोविड सेंटर सुरू करणे शक्य नसल्याचे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी सांगितले.

अकोले (अहमदनगर) : तालुक्यात कोविड सेंटर उभारणे गरजेचे असले तरी त्यासाठी आरोग्य अधिकारीच नसल्याने कोविड सेंटर सुरू करणे शक्य नसल्याचे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी सांगितले. यावरून त्यामुळे प्रशासन हतबल असल्याचे दिसत असून अकोलेकरांचे आरोग्य रामभरोसे असल्याचे दिसते.

अकोले तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 1000 चा टप्पा पूर्ण करणार असून तालुक्यात कोव्हीड सेन्टर उभारणे गरजेचे आहे,अँटिजेंट टेस्ट वाढविणे,बाधित पत्रकारांसाठी बेड्सची व्यवस्था करणे त्यांच्या उपचाराला प्राधान्य क्रम देणे,तालुक्यातील विविध भागात उपचार केंद्र सुरू करण्यात यावे या आशयाचे निवेदन आज अकोले तालुका पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार मुकेश कांबळे यांना देण्यात आले,यावेळी अकोले नगरपंचायत चे मुख्याधिकारी विक्रम जगदाळे उपस्थित होते.यावेळी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय पोखरकर,, जेष्ठ पत्रकार शांताराम काळे, डी.के वैद्य,संपर्क प्रमुख विद्याचंद्र सातपुतेअनिल नाईकवाडी यांनी तालुक्यातील कोरोनाच्या विविध प्रश्नांवर संवाद साधून सकारात्मक चर्चा केली.
यावेळी तहसीलदार कांबळे बोलत होते.

कांबळे पुढे म्हणाले की, समशेरपूर,राजूर,शेंडी या ठिकाणी अँटिजेंट टेस्ट ची सुविधा असून इतर ठिकाणी लवकरच टेस्ट ची सुविधा करणार आहोत.शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत तालुक्यातील सर्व नागरिकांची तपासणी केली जाणार आहे,त्यामध्ये थर्मल चेकिंग,ऑक्सिजन तपासणी,कुटुंबात कोणाला कोणते आजार आहेत,त्याची माहिती व त्यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित करणार आहोत.प्रशासनाच्या दोन व्यक्ती व एक गावातील एक समन्वयक अशी तिघांची टीम असणार आहे.तालुक्यात एकाच वेळी 50 कुटुंबाची तपासणी केली जाणार आहे.मास्क न वापरण्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे.

188 कलम अन्वये गुन्हाही दाखल होऊ शकतो,तसे झाले तर त्या व्यक्तीला मा.कोर्टाने दंड केला तर त्या व्यक्तीस परदेशी जाण्याचा व्हिसा मिळनार नाही. अशी माहिती दिली.सध्या तालुक्यात पुरेसे बेड्स उपलब्ध असून अगस्ति कारखाना अजून 50 बेड्सची ची सुविधा करणार आहे.सर्व नागरिकांनी मास्क वापरणे,सोशल डिस्टन्सनिंग चे नियमांचे पालन करणे,कामाशिवाय बाहेर न पडणे,आपली काळजी आपणच घेणे असे आवाहन तहसीलदार कांबळे यांनी केले.

मुख्याधिकारी जगदाळे यांनी मास्क न वापरण्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे सूतोवाच केले.व्यापारी वर्गाने स्वयंस्फूर्तीने व्यवसाय बंद ठेवून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चांगले सहकार्य केले आहे. अकोले शहरात लवकरच निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. शेवटी आभार संपर्क प्रमुख विद्याचंद्र सातपुते यांनी मानले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It is not possible to start covid Center as there is no health officer in Akole