गोदावरीच्या शेतीसाठीच्या आवर्तनाचा निर्णय झाला, नगर-औरंगाबादला होईल फायदा

सतीश वैजापूरकर
Thursday, 18 February 2021

पुढील तीन दिवसांत राहाता, शिर्डी व वैजापूर या पालिकांसह तीन सहकारी साखर कारखाने, आसवानी प्रकल्प व विविध ग्रामपंचायतीच्या पाणी योजनांची साठवण तळी भरली जातील. 

शिर्डी ः गोदावरी कालव्यांतून शेतीसाठी येत्या रविवारी (ता.21) पाणी सोडण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने आज जाहीर केले. पिण्याच्या पाणी योजनांची साठवण तळी भरल्यानंतर येत्या 1 मार्च पासून सिंचन सुरू होईल. हे आवर्तन रब्बी हंगामासाठी शेवटचे आणि उन्हाळी हंगामासाठी पहिले असेल. पुढे मे महिन्यात आणखी एक आवर्तन देऊन उन्हाळी हंगामाची सांगता केली जाईल. 

हेही वाचा - होता कोण हा, ज्याच्यासाठी गडाख रडले

सध्या मराठवाड्यात जाणा-या जलद कालव्यासाठी दारणा धरणातून 900 क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. हा कालवा 750 क्युसेक्स वेगाने वहातो आहे. त्यामुळे मधमेश्वर मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.

गोदावरी कालव्याचे दरवाजे उघडले की लगेचच आवर्तन सुरू होईल. 21 फेब्रुवारी रोजी गोदावरी कालव्यात सोडलेले पाणी 25 फेब्रुवारी पर्यंत चितळी या शेवटच्या टोकाकडील परिसरात पोहोचेल. पुढील तीन दिवसांत राहाता, शिर्डी व वैजापूर या पालिकांसह तीन सहकारी साखर कारखाने, आसवानी प्रकल्प व विविध ग्रामपंचायतीच्या पाणी योजनांची साठवण तळी भरली जातील. 
एक किंवा दोन मार्चपासून शेतीसाठी सिंचन सुरू होईल. ते 25 मार्चपर्यंत चालेल. त्यानंतर उन्हाळी हंगामातील शेवटचे आवर्तन एक ते पाच मे पर्यत सोडण्यात येईल. उन्हाळी हंगामात शेतीसाठी दोन आवर्तने मिळतील. अशा पध्दतीने जलसंपदा विभागाने पाणी वाटपाचे नियोजन केले आहे. 
ते सुरळीतपणे पार पडले, तर येत्या उन्हाळ्यात या कालव्यांच्या लाभक्षेत्रात शेतीसाठी पाण्याचा तुटवडा भासणार नाही. कारण 25 मे पर्यत या कालव्यांतून पाणी वहाते राहील. शिवाय चांगल्या पावसामुळे भुगर्भातील पाण्याची पातळीदेखील टिकून आहे. वीजपुरवठा विस्कळीत झाला तरीही लाभक्षेत्रातील पिकांना उन्हाळी हंगामात त्याचा फारसा फटका फारसा बसणार नाही.

शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील व कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांकडे गोदावरी कालव्यातून शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्याबाबत चर्चा केली. जलद कालव्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे. दारणा व गोदावरी नदि तसेच मधमेश्वर बंधा-यातून पाणी वहाते आहे. त्यामुळे अशातच गोदावरी कालव्यांसाठी आवर्तन सोडले तर पाणीनाश टळेल हे लक्षात घेऊन गोदावरी कालव्यांसाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It was decided to rotate for agriculture from Godavari canals