110 फूट खोल विहीरीत वीज कोसळली अन्‌ क्षणातच... 

शांताराम जाधव 
Monday, 27 July 2020

संगमनेर तालुक्‍यात गुरूवारी मध्यरात्री पडलेल्या पावसामुळे अनेक गावांमध्ये शेतातील पिकांचे नुकसान झाले. 

बोटा (अहमदनगर) : संगमनेर तालुक्‍यात गुरूवारी मध्यरात्री पडलेल्या पावसामुळे अनेक गावांमध्ये शेतातील पिकांचे नुकसान झाले. पण त्याच पावसामुळे संगमनेर तालुक्‍यातील जांबुत येथे एक विहीरच सपाट झाली आहे. त्यामुळे शेतकरी कुटुंबासमोर नवीन संकट उभे राहीले आहे. 

जांबुत येथे बन्सी मोहीते, रोहीदास मोहीते, चंद्रकांत मोहीते, विलास मोहीते, शांताराम मोहीते यांची सामूहिक विहीर आहे. 110 फूट खोली असलेल्या या विहीरीचे गेल्यावर्षी त्यांनी कर्ज काढून 90 फूटापर्यंत सिमेंट रींगचे बांधकाम केले होते. या विहीरीवर त्यांचे सात एकर बागायती क्षेत्र होते. त्यातूनच त्यांना कौटुंबिक उत्पन्न मिळत होते.

येथे सलग तीन तास पडलेल्या पावसात विहीरीवर वीज कोसळून सिमेंट रिंगचे बांधकाम पूर्णपणे ढासळले. त्याचबरोबर नजीक असलेले दिडशे फूट पाईपही विहीरीत गेला. शुक्रवारी मोहीते कुटुंबातील सदस्य नेहमीप्रमाणे शेतात आले. तेव्हा संपूर्ण विहीरच जमीनदोस्त झाल्याचे निदर्शनास आले. 

तलाठी कार्यालयाकडून याचा पंचनामा झाला असून शासकीय मदत मिळावी, असे मोहीते कुटुंबाने विनंती केली आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jambut village in Sangamner taluka the construction of a well collapsed due to rain