जामगावमध्ये एका व्यक्तींला मारहाण करून एक लाख 30 हजार रूपये लुटले

मार्तंड बुचुडे
Thursday, 10 September 2020

दैठणे गुंजाळ येथील दादाभाऊ सुभाष शिंदे हे आपल्या घरी जात असताना जामगाव येथील प्राथमिक शाळेजवळ पाठिमागून आलेल्या कार व दुचाकीवरून आलेल्या पाच जणांनी तू आमच्या गाडीला कट का मारला, असे म्हणून गाडी थांबवून बेदम मारहाण केली.

पारनेर (नगर) : दैठणे गुंजाळ येथील दादाभाऊ सुभाष शिंदे हे आपल्या घरी जात असताना जामगाव येथील प्राथमिक शाळेजवळ पाठिमागून आलेल्या कार व दुचाकीवरून आलेल्या पाच जणांनी तू आमच्या गाडीला कट का मारला, असे म्हणून गाडी थांबवून बेदम मारहाण केली. तसेच  त्याच्याजवळ असणारी एक लाख पाच हजाराचे सोन्याचे दागिणे व रोख 25 हाजार रूपये असा ऐवज बळजबरीने काढून घेऊन पोबारा केला. याबाबत पारनेर पोलीस ठाण्यात शिंदे यांनी फिर्याद दिली असून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

या बाबत माहिती अशी की, दादाभाऊ शिंदे (वय30 रा. दैठणे गुंजाळ) हे आपल्या कारमधून (एम.एच.16 बी.एम. 47 41) आपल्या घरी (ता.8) रोजी रात्री नऊ वाजता जात होते. ते जामगाव येथील प्राथमिक शाळेजवळ आले असताना पाठिमागून आलेल्या पांढ-या रंगाच्या कारमधील प्रकाश पवार व दुचाकीवरून आलेल्या गणेश माळी (रा.जामगाव) व इतर तीन अनोळखी आरोपी यांनी शिंदे यांना तू आमच्या गाडीला कट मारला, असे म्हणून गाडी थांबण्यास भाग पाडले. त्यानंतर शिंदे यांनी गाडी थांबवली व गाडीतून खाली उतरवले व लगेचच त्यांना या पाच जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

या वेळी प्रकाश पवार याने शिंदे यांच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची सोन्याची चैन व एक तोळा वजनाची सोन्याची पट्टी व आरोपी गणेश माळी याने खिशातील 25 हजार रूपये रोख बळजबरीने काढून घेतले. आम्ही तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन आरोपी त्यांच्याकडे असलेल्या कार व दुचाकीवरून जामगावच्या दिशेने पळून गेले. याबाबत शिंदे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात वरील पाच जणांविरोधात फिर्याद दिली असून पारनेर पोलीस ठाण्यात यांच्या विरोधात मारहाण तसेच लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस सहायक निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक  बालाजी पद्मने करत आहेत.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Jamgaon, a man was beaten and jewelery and money were looted