esakal | राम शिंदे आले अॅक्शन मोडमध्ये, आता पवारांची दादागिरी खपवून घेणार नाही
sakal

बोलून बातमी शोधा

In Jamkhed, Ram Shinde came into action mode

विधानसभा निवडणुकीच्या वर्षपूर्तीनंतर जामखेड तालुक्याने काय कमवले? काय गमवले? या विषयावर माजी मंत्री राम शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

राम शिंदे आले अॅक्शन मोडमध्ये, आता पवारांची दादागिरी खपवून घेणार नाही

sakal_logo
By
वसंत सानप

जामखेड : कर्जत-जामखेड मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार राम शिंदे हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. दोन्ही ठिकाणच्या पंचायत समितीची सत्ता आमदार रोहित पवारांनी राष्ट्रवादीकडे आणली. त्यानंतर राम शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, आमदारकीला वर्षपूर्ती झाल्यानंतर शिंदे यांनी कामाचा हिशेब मागितला आहे. पवारांचे राजकारण खपवून घेणार नाही, असे इशारा देतानाच ते अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

" दबाव तंत्राचा अवलंब करुन नगरपालिका, पंचायत समितीत सत्तांतर घडविले, हे पवार घराण्याला शोभणारे नाही; तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सहकारी संस्थांना राज्य शासनाने मुदत वाढ दिलेली असताना आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेडच्या दोन्ही बाजार समित्यांवर प्रशासक नेमले. त्यांच्याकडून सुरु असलेले दबावतंत्राचे राजकारण यापुढे सहन करणार नाही, येथील जनता त्यांनी वेळीच धडा शिकवेल, असा पलटवार माजी मंत्री राम शिंदे यांनी केला.

विधानसभा निवडणुकीच्या वर्षपूर्तीनंतर जामखेड तालुक्याने काय कमवले? काय गमवले? या विषयावर माजी मंत्री राम शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, भाजपचे तालुकाध्यक्ष अजय काशीद, जिल्हासरचिटणीस अॅड. प्रवीण सानप, युवकाध्यक्ष शरद कार्ले, शहराध्यक्ष बिभिषण धनवडे, गौतम उतेकर, सोमनाथ राळेभात, लहू शिंदे आदींसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी माजी मंत्री शिंदे म्हणाले," वर्षभराचा कालवधी गेला, राज्यात सत्तांतर होऊन महाआघाडीचे सरकार स्थापन झाले. कर्जत-जामखेड मतदारसंघात ही परिवर्तन होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार झाले. मात्र, वर्षभराचा काळात तालुक्यात एकाही विकासकामाला मंजुरी मिळाली नाही. नवीन काम सुरू झाले नाही. उलट सुरू असलेली कामे थांबवली. तसेच आम्ही मंजूर करुन सुरू केलेल्या विकास कामांचा दुबार नारळ वाढवून शुभारंभ करण्याचा केविलवाणा प्रकारही त्यांनी केला.

कामाचा शुभारंभ करण्यासाठी आई-वडीलदेखील पुढे येत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून आवश्यक तो प्रोटोकॉलही पवारांकडून पाळला जात नाही, अशी टीका शिंदे यांनी आमदार रोहित पवारांवर केली. तसेच कोरोनाच्या काळात जामखेड येथे डॉ.आरोळे संचलित  ग्रामीण आरोग्य प्रकल्पा अंतर्गत सुरु असलेले कोवीड सेंटर हे स्वतःच्या पुढाकाराने सुरु असल्याचे लोकप्रतिनिधींनी भासवले.

स्वतः कोविड सेंटर का काढलं नाही

प्रत्यक्षात विविध दानदात्यांच्या मदतीने, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने हे सेंटर चालले. स्वतः मात्र, कोवीड सेंटर सुरू केले नाही. कोरोनाचा काळात योजना राबविण्याकरिता अडचण असल्याचे लोकप्रतिनिधी कडून सांगितले जाते. मात्र, स्तःचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील मुलांना दोन दोन तास ताटकळत ठेवण्याचे काम लोकप्रतिनिधींनी केले. 144 कलमाचे उल्लंघन केले. अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करणे हे लोकप्रतिनिधीला अशोभनीय आहे.

सोशल मीडियातून दबाव

सोशल मीडियाच्या माध्यमातून दिशाभूल करण्याचे काम लोकप्रतिनिधींनी केले आहे. मतदारसंघात स्वतःचे उद्योग व्यवसाय वाढविण्याचे काम त्यांनी केले. शेतकरी परिसंवादाच्या माध्यमातून स्वतःकडील बी-बियाणे विकणे, माश्यांची पिल्लं, कोंबड्यांची पिल्लं आमच्याकडून घ्या, असा आग्रह त्यांनी धरला. बचत गटांची ही कुचंबणा केली. आमच्याशी जोडले गेला तरच अनुदान मिळेल, असा दम भरला जातोय,अशी टीकाही आमदार पवार यांच्यावर केली.