
देशात सुरु असलेल्या शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळण्यामागे पाकिस्तान व चीनचा हात असल्याचा जावईशोध केंद्रीय राज्य़मंत्री, भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी लावला आहे.
संगमनेर (अहमदनगर) : देशात सुरु असलेल्या शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळण्यामागे पाकिस्तान व चीनचा हात असल्याचा जावईशोध केंद्रीय राज्य़मंत्री, भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी लावला आहे. शेतकरी व कामगारांच्या भावनांशी खेळण्याच्या या प्रकारच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी, संगमनेर शिवसेनेच्या वतीने शहरातील नवीन नगर रस्त्यावर दानवेंच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन केले.
केंद्र सरकारने पाशवी बहुमताच्या जोरावर संसदेत पारित केलेल्या तीन कृषी कायद्यां विरुद्ध दिल्लीच्या सीमेवर शेतकरी बांधवांनी मोठे आंदोलन सुरू केले आहे. वर्षभर शेतात राबून काबाडकष्ट करणाऱ्या व आपल्या न्याय हक्कासाठी थेट दिल्लीच्या सीमेवर पोचलेल्या आंदोलक शेतकऱ्यांवर केंद्र सरकारने लाठीमार व पाण्याचा मारा करुन अवमान केला आहे. त्यातही कहर म्हणजे या आंदोलकांवर विविध मानहानीकारक आरोप करण्यातही केंद्र सरकारचे मंत्री मागे नाहीत.
नुकतेच या आंदोलनामागे पाकिस्तान व चीन असल्याचा दावा करुन, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना देशद्रोह्यांच्या रांगेत नेले आहे. यापूर्वीही शेतकऱ्यांविरोधात गरळ ओकणाऱ्या दानवेंचा निषेध करण्याचे आदेश शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे नाना यांनी दिले होते. त्यानुसार संगमनेर शहर व तालुका शिवसेनेच्यावतीने दानवे यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला.
या वेळी शहरप्रमुख अमर कतारी, पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, माजी तालुका प्रमुख जनार्दन आहेर, युवा जिल्हा समन्वयक भाऊसाहेब हासे, उपशहर प्रमुख पप्पू कानकाटे, इम्तियाज शेख, लखन घोरपडे, युवासेना जिल्हा प्रमुख अमित चव्हाण, ज्ञानेश्वर कांदळकर, दीपक साळुंके, प्रथमेश बेल्हेकर, संभव लोढा, ब्रम्हा खिडके, भीमा पावसे, राजाभाऊ सातपुते, फैजल सय्यद संतोष कुटे, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख सुरेखा गुंजाळ, महिला शहर प्रमुख संगिता गायकवाड, आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
संपादन : अशोक मुरुमकर