सकल मराठा समाजाच्या वतीने ‘तो’ गुन्हा मागे घ्यावा या मागणीसाठी कर्जत बंद

नीलेश दिवटे
Tuesday, 11 August 2020

कर्जत तालुक्यातील आंबिजळगाव येथील शेतकऱ्यांवर दाखल केलेला ॲट्रोसीटीचा खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा.

कर्जत (अहमदनगर) : कर्जत तालुक्यातील आंबिजळगाव येथील शेतकऱ्यांवर दाखल केलेला ॲट्रोसीटीचा खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा. या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज कर्जत बंद पुकारण्यात आला होता

शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवीत अत्यंत कडकडीत बंद पाळण्यात आला. या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नसून मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. येत्या १० दिवसात सदर प्रकरणी सखोल तपास करून दोषींवर कारवाई करण्यात येईल. बंद आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांनी केल्यानंतर सदर आंदोलन १० दिवसासाठी स्थगित करीत असल्याचे सकल मराठा समाजाचे समन्वयक प्रा. तान्हाजी पाटील यांनी जाहीर केले.

तालुक्यातील आंबिजळगांव ते खातगांव हा रस्ता येथील शेतकरी लक्ष्मण निकत यांनी बंद केला होता. यानंतर सचिन शेटे यांनी अडवणूक केली म्हणून लक्ष्मण निकत, लहु निकत व बापु निकत यांचेवर ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल केला. यातील संशयित आरोपी लक्ष्मण निकत व लहु निकत यांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र सचिन शेटे यांनी दाखल केलेला गुन्हा खोटा आहे. 

राजकीय हेतूने प्रेरित आहे असा आरोप करीत तो त्वरित मागे घेण्यात यावा. या मागणीसाठी आज  सकल मराठा समाज व सहविचार नागरिकांचे वतीने कर्जत शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान सकल मराठा समाजाचे समन्वयक प्रा. तानाजी पाटील व मान्यवरांसह उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांच्यात बैठक झाली.

पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड, नितीन तोरडमल, अॅड. धनंराज राणे, दीपक यादव, रामेश्वर तोरडमल, दादा सुरवसे, राहुल नवले, अनिल निकत, महेंद्र धोडाद,विजय मोरे उपस्थित होते. 

पोलिस योग्य दिशेने तपास करीत असून १० दिवसात तो पूर्ण करून यातील असलेल्या दोषींवर कारवाई करण्यात येईल. सर्वांनी कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे.
- संजय सातव, उपविभागीय पोलिस अधिकारी, कर्जत 

तालुक्यात जातीय सलोखा असून सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. आंबी जळगाव येथील सदर गुन्हा हा राजकीय हेतूने प्रेरित आहे. वास्तविक आंबी जळगाव ते खातगाव रस्त्याचा प्रश्न सामंजस्याने सुटला असता. मात्र त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न होत आहे. पोलिसांनी यातील सत्य शोधून यातील दोषींवर कायदेशीर कारवाई करावी.
- प्रा. तान्हाजी पाटील, समन्वयक, सकल मराठा समाज, कर्जत
 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karjat closed on behalf of the entire Maratha community demanding withdrawal of the crime