
तालुक्यातील सेवा निवृत्त कृषी अधिकारी मोहन लाढाने यांचे चिरंजीव गणेश यांचा शुभविवाह श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी बुद्रुक येथील दादासाहेब गव्हाणे यांची कन्या विशाखा हिच्याशी झाला. यावेळी या सोहळ्यात मान-पान देत अवास्तव खर्च टाळून कुठलाही जाहीर सत्कार न करता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्यावत अशी रुग्णवाहिका भेट दिली.
कर्जत (अहमदनगर) : कोरोनासारख्या संकट काळात अनेक कोरोना योद्धे, लढवय्ये आपण पाहिले. मात्र, लग्न सोहळ्यातील मान, पान, हार, तुरे, फेटे हे सोपस्कार टाळून कोरोनासह इतर रुग्णाच्या दिमतीला सर्व सुविधा युक्त मोफत रुग्णवाहिका लाढाने कुटुंबीयांनी उपलब्ध करून दिली आहे. या अनोख्या भेटीची तालुक्यात सर्वत्र चर्चा आणि कौतुक सुरू आहे. या रुग्णवाहिकेची दहा लाख रुपये किंमत असून रुग्णासाठी वैद्यकीय सल्ला, चालक आणि इंधनाचा खर्च अभिनव युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून धनंजय लाढाने हे करणार आहेत.
तालुक्यातील सेवा निवृत्त कृषी अधिकारी मोहन लाढाने यांचे चिरंजीव गणेश यांचा शुभविवाह श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी बुद्रुक येथील दादासाहेब गव्हाणे यांची कन्या विशाखा हिच्याशी झाला. यावेळी या सोहळ्यात मान-पान देत अवास्तव खर्च टाळून कुठलाही जाहीर सत्कार न करता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्यावत अशी रुग्णवाहिका भेट दिली. तिचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. या अनोख्या भेटीची आणि लग्नाची सर्वत्र चर्चा आणि कौतुक सुरू आहे.
अभिनव युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम सुरू असतात. कोरोना काळात रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी अद्यावत रुग्णवाहिका उपलब्ध होताना अडचण यायची. तसेच अनेक रुग्ण असल्याने मोठी समस्या निर्माण व्हायची. यासाठी लग्न सोहळ्यातील सत्काराला फाटा देत या रुग्णांच्या सेवेसाठी दहा लाखाची अद्यावत अशी रुग्णवाहिका सप्रेम भेट म्हणून दिली आहे. वैद्यकीय सल्ला, इंधन, चालकाचा सर्व खर्च आम्हीच करणार आहोत.
- धनंजय लाढाने, संस्थापक- अभिनव युवा प्रतिष्ठान,कर्जत
संपादन - सुस्मिता वडतिले